साहित्य व संस्कृती
‘साहित्य पुरस्कार’ हा लेखकाला लेखणाची ऊर्जा देणारा घटक-डॉ.देशमुख
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“ कोणताही साहित्य पुरस्कार हा लेखकाला पुढील लेखणाची ऊर्जा देणारा व त्यापुढे जबाबदारीने लेखन करण्याची प्रेरणा देणारा असतो असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार व चित्रपट पटकथा लेखक डॉ. सदानंद देशमुख यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“आज मराठी साहित्यात लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या भि. ग.रोहमारे ग्रामीण सहित्य पुरस्काराचे वितरण माझ्या हस्ते होते आहे त्याचा आनंद दीर्घकाळ स्मरणात राहणारा आहे. कारण १९९० साली माझ्या अंधारबन कथासंग्रहाला पहिला भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त झाला होता”-डॉ.सदानंद देशमुख,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार व चित्रपट पटकथा लेखक.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार के.बी.रोहमारे यांच्या चोवीसाव्या पुण्यस्मरण व भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. देशमुख बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे होते.
सदर कार्यक्रमास भि.ग.रोहमारे ट्रस्ट पोहेगांवचे अध्यक्ष रमेश रोहमारे,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य चंद्रशेखर कुलकर्णी,जवाहर शहा,अॅड. संजय भोकरे, मा. सुनिल शिंदे,संदिप रोहमारे,सुनिल बोरा,परीक्षक डॉ. भिमराव वाकचौरे,रोहमारे कुटुंबीय कोपरगाव परिसरातील साहित्य रसिक,सेवकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
डॉ.देशमुख पुढे म्हणाले की,”महाराष्ट्राचे खरे विद्यापीठ नेवाशाला आहे.कारण तेथेच युगकर्ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या कालजयी ग्रंथाची निर्मिती केली. नवनिर्मितीची आस व कृषि संस्कृतीतून प्रेरणा घेऊनच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या अजरामर ग्रंथाची रचना केली. यातून कृषि व कष्टकरी संस्कृतीच्या आड येणाऱ्या खलप्रवृत्तीचा नाश करण्याचा संदेश दिला गेला.” त्यानंतर डॉ.देशमुख यांनी आपल्या ‘बारोमास’ या साहित्य अकादमी प्राप्त कादंबरीच्या निर्मितीची प्रेरणा ठरलेली ‘बारोमास’ हो कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.
समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना पद्मकांत कुदळे म्हणाले की, “के.बी.रोहमारे यांना व्यक्तीगत आयुष्यात खूप मोठे होता आले असते कारण त्यांच्या भोवती यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील, बाळासाहेब भारदे,शंकरराव चव्हाण यासारखी हिमालयाएवढी उंचीची माणसे होती.परंतू शेवटपर्यंत केवळ शेतकरी,शेतमजूर य कष्टकरी वर्गाशी नाळ जोडलेली असल्याने ते त्यांच्या उन्नतीसाठीच जगले. अहमदनगर जिल्हा आणि कोपरगाव तालुक्यातील अनेक शेती केंद्रीत संस्थांच्या उभारणीत व विकासात के.बी.यांचा सिंहाचा वाटा आहे. तरी देखील त्यांनी त्याचे कधीही भांडवल केले नाही.के.बी.रोहमारे हे वरून शहाळयासारखे कडक परंतू आतून खूप मऊ व मायाळू होते. त्यांच्या प्रेरणेनेच आजही या महाविद्यालयामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे. “
या प्रसंगी अशोक रोहमारे यांनी,”आपल्या तीर्थरूपांच्या आठवणी जागवत भि.ग.रोहमारे साहित्य पुरस्काराचा इतिहास विशद केला.संस्थेचे सचिव अॅड्. संजीव फुलकर्णी यांनी भि.ग.रोहमारे पुरस्कार योजनेसाठी गेली ३२ वर्षे योगदान करणाऱ्या रोहमारे परिवाराचे कौतुक करत भविष्यातही हा पुरस्कार असाच सुरू राहिल असे आश्वासन दिले.पुरस्कार योजनेचे कार्यवाह व परीक्षक डॉ.गणेश देशमुख यांनी पुरस्कार प्राप्त लेखक व त्यांच्या साहित्यकृतींचा परिचय करून देत निवडसमितीची भूमिका स्पष्ट केली.
या प्रसंगी भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त करणारे कादंबरीकार संतोष जगताप (सांगोला,जि. सोलापूर), माधव जाधव (नांदेड),जयराम खेडेकर (जालना),केदार काळवणे (कळंब,जि.उस्मानाबाद), अनंता सूर (वणी,जि.यवतमाळ) यांना डॉ.सदानंद देशमुख यांच्या शुभ हस्ते वर्ष २०२० चे भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. व त्यानंतर त्यांनी सत्काराला उत्तर देतांना आपापल्या लेखनामागील प्रेरणा व भूमिका कथन करतांना नमुना दाखल मार्मिक कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले. तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.डॉ.जिभाऊ मोरे यांनी करून दिला.सूत्रसंचलन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी केले.महाविद्यालय विकास समितीचे संचालक अॅड. राहुल रोहमारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहे.