सहकार
कोपरगावातील..या कारखान्याने केला उसाचा दर जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरु होत असतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी ऊस दराबाबत निर्णय जाहीर करून २०२१-२२ च्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला २ हजार ५०० रुपये दर नुकताच आज एका कार्यक्रमात जाहीर केला आहे.
“गुजरात राज्यात उसाला प्रति टनाचे दर किमान ०४ हजार तर कमाल ०४ हजार ५०० दिला जात आहे.तर उत्तर प्रदेशात हाच दर साखर कारखानदार प्रति टनाला ०३ हजार ५०० रुपये दिला जात आहे.शिवाय उपपदार्थ निर्मितीचा वेगळा दर द्यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली असून राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांची किती आर्थिक लूट करत आहेत याचा शेतकऱ्यांनी विचार करायला हवा व त्या अपप्रवृत्तीस जोरदार विरोध करायला हवा”-रघुनाथ दादा पाटील,प्रदेशाध्यक्ष,शेतकरी संघटना
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे जेष्ठ संचालक,मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे व त्यांच्या धर्मपत्नी पुष्पाताई काळे यांच्या हस्ते पूजन करून व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला आहे.त्याप्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी जेष्ठ नेते छबुराव आव्हाड,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पूर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कारखान्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,माजी उपाध्यक्ष एम.टी.रोहमारे,कारभारी आगवण,नारायण मांजरे संचालक मंडळ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,संभाजी काळे,कारखान्याचे महाव्यस्थापक सुनील कोल्हे,आसवणी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद,सहसचिव एस.डी. शिरसाठ,कर्मव्यवस्थापक दौलतराव चव्हाण,मुख्य अभियंता निवृत्ती गांगुर्डे,मुख्य रसायन तज्ञ सुर्यकांत ताकवणे,मुख्य लेखापाल सोमनाथ बोरनारे,शेतकी अधिकारी कैलास कापसे,उद्योग समुहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी,कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते,संचालक,सभासद,शेतकरी व कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना म्हणाले की,”मागील दोन हंगामामध्ये ऊस उत्पादन व साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले मात्र साखर निर्यातीस दिलेला सकारात्मक प्रतिसाद व इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात आल्यामुळे साखर साठे नियंत्रित ठेवता आले अन्यथा साखरेचे दर घसरले असते.मात्र साखर कारखानदारी आर्थिक नियोजन करून दिवसेंदिवस व्यवसायाभिमुख व जागतिक बदलास प्रतिसाद देत मार्गक्रमण करीत आहे.कारखान्याने चालू गळीत हंगामात ७.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून कारखाना कार्यक्षेत्रात १०,५०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. त्यातूनच गाळपाचे उद्दिष्टाइतका ऊस उपलब्ध होणार असल्याने कार्यक्षेत्राबाहेरील पारंपारिक गेटकेन ऊस सेंटरवरून यावर्षी ऊस घेता येणार नाही.आजवर कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील असा कोणताही भेदभाव न करता सरसकट एकच ऊस दर दिल्यामुळे कार्यक्षेत्राबाहेरील अनेक ऊस उत्पादक शेतकरी ऊस गळीतास घेण्याचा आग्रह करीत असले तरी यावर्षी ते शक्य नाही.मात्र कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होवून गाळप क्षमता वाढल्यानंतर या शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला प्राधान्य देणार असल्याचे सांगून कारखाना कामगारांना देखील मागील वर्षीप्रमाणे १८ टक्के बोनस देण्याचे जाहीर केले आहे.केंद्र शासनाने मागील वर्षाचे एफआरपी मध्ये प्र.मे. टन रु.५० वाढ करून ती चालू हंगामासाठी रु.२९०० प्रती मेट्रिक टन १० टक्के साखर उताऱ्याकरिता केलेली असली तरी इंधनाचे दर वाढल्यामुळे ऊस तोडणी व वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. संपूर्ण जगाच्या ऊस दराचा विचार केल्यास आपल्या देशातील ऊसाचे दर साखर उत्पादन खर्च हा जास्त आहे त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा कसा मिळविता येईल यासाठी (उपपदार्थांचा हिशेब देण्याऐवजी) ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे असा सल्ला द्यायला ते विसरले नाही.
मागील चार वर्षात आपल्या देशातून १७० लाख मे.टन साखर निर्यात झाली असून चालू हंगामात २०२१ मध्ये जागतिक स्तरावर जवळपास ४० ते ६० लाख मे. टन साखरेचा तुटवडा भासणार आहे.ब्राझील देशात मोठा दुष्काळ व प्रतिकूल हवामानाचा ऊस उत्पादनावर परिणाम होवून साखर उत्पादन घटणार आहे व थायलंडमध्ये देखील साखर उत्पादन घटणार आहे.त्यामुळे साखर उत्पादनात दुसऱ्या स्थानावर असलेल्या आपल्या देशाला साखर निर्यातीची चांगली संधी असून आंतरराष्ट्रीय साखर दराचा विचार करून चालू हंगामात कच्ची साखर निर्मिती करून साखर निर्यात करण्याबाबत लवकरच घेवू.सहकार खाते राज्याच्या अखत्यारीत असलेला विषय आहे मात्र केंद्र शासनाने नव्याने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे.त्यातून विविध विकासात्मक योजना देशासाठी राबविणे अभिप्रेत असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त करून केंद्रीय सहकार मंत्र्यांनी आयकराबाबत कुठल्याही साखर कारखान्यांवर कार्यवाही होणार नसल्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची टिपणी करून त्याच्या अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी उपस्थितांचे आभार मानले.