सण-उत्सव
कोपरगावात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरासह परिसरात ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.दरवर्षी मोठा गाजावाजा करत जुलूस काढून विविध सामाजिक उपक्रम राबवून पैगंबर जयंती साजरी केली जाते मात्र यंदा कोरोनाचा संकट असल्याने मुस्लिम बांधवांकडून अत्यंत साध्या पद्धतीने सध्याची गरज ओळखून रक्तदान करून पैगंबर जयंती साजरी करण्यात आली आहे.
कोरोनाची सद्य स्थिती पाहता बहुतेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे.रक्त वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे.अशा परिस्थितीत आपण केलेल्या रक्तदानाने गरजूंचा रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत होईल या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हीच शिकवण मोहम्मद पैगंबर यांनी पूर्ण जगाला दिली आहे-मेहमूद सय्यद,नगरसेवक,कोपरगाव पालिका.
ईद-ए-मिलाद म्हणजे ‘अल्लाह‘ चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो.मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते.आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.वर्तमानात कोरोना साथ सुरु असल्याने हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात अडचण आल्याने अनेकांनी या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील संजीवनी ब्लड बँक येथे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी पन्नास पेक्षा अधिक तरुणांनी रक्तदान केले.याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,मौलाना अब्दुल हमीद राही,नगरसेवक महेमूद सय्यद,रियाज सर,नगरसेवक मंदार पहाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरकार ग्रुपचे सय्यद,अरबाज सय्यद,पप्पू सय्यद,राजू सय्यद,वसीम शेख,रईस शेख आदी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.