ग्रामविकास
…ही पंचायत समिती बनली कचरा कुंडी ?

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः हातात झाडू घेऊन दर ०२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त,’स्वच्छ भारत मिशन’ राबवत असताना व कोपरगाव पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी या स्वच्छ अभियानाचे नेतृत्व करत असताना कोपरगाव पंचायत समितीच वर्तमानात अस्वच्छतेचे आगर तथा कचरा कुंडी बनली असल्याचे परिसरातील अस्वच्छता पाहून वाटत असून याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

“स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत प्रत्येक पंचायत समितीला सरकारने ०३ लाखांचा निधी दिला होता.राहाता पंचायत समितीने त्याची निविदा काढून स्वच्छता मोहीम राबवली आहे.मग कोपरगाव पंचायत समितीने या निधीचा नेमका विनियोग कुठे केला आहे ?- अर्जुन काळे,माजी उपसभापती,कोपरगाव पंचायत समिती.

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी,अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली.प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले,एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकास कामे ही लोकसहभागातून करण्यात आली.शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी,घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी,वैयक्तिक स्वच्छता,परिसर स्वच्छता,सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन,मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.त्यानंतर देशात सन २०१४ साली केंद्रात सत्तांतर झाले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन-(ग्रामीण) ही भारत सरकारची एक प्रमुख योजना जाहीर केली होती.ग्रामीण भागात स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी राबविण्यात येते.या योजनेअंतर्गत,प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देणे,उघड्यावर शौचास जाणे थांबवणे,घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छता यावर लक्ष केंद्रित केले जाते.त्यासाठी ग्रामीण पातळीवर पंचायत समितीचे प्रशिक्षित अधिकारी ग्रामस्थांत जागृती करताना दिसत असले तरी कोपरगाव पंचायत समिती आणि तिच्या परिसराची वर्तमान अस्वच्छता पाहून दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून आल्याशिवाय राहणार नाही.पंचायत समितीसह राज्यात नगर परिषदांमध्ये जवळपास चार वर्षापासून प्रशासकराज आहे.त्यामुळे त्या ठिकाणी राजकीय नेत्यांचे वास्तव्य जाणवत नसल्याने अधिकारी आणि प्रशासन बेताल असल्याचे दिसत आहे.

“यापूर्वीचा स्वच्छता करणारा रोजंदारीवर असलेला माणूस स्वच्छता नीट करत नसल्याने त्यास काढून टाकले आहे.दुसरा माणूस नेमला असताना त्यानेही तीच ‘री’ ओढल्याने त्यालाही काढून टाकले आहे.आता नवीन माणूस शोधून लवकरच ही स्वच्छता केली जाईल’- संदीप दळवी,गटविकास अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.
कोपरगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्या केल्या उजव्या बाजूस असलेल्या भिंतीच्या कडेला चहा,लस्सी तथा शीतपेये पिऊन टाकलेले कागदी कप,पाण्याच्या मोकळ्या बाटल्या व तत्सम कचरा मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून पुढे झाडांचा पालापाचोळा कुजून त्याचे सेंद्रिय खतात रूपांतरण झालेले सहज दृष्टीस पडलेले दिसून येत आहे.श्री दत्त मंदिर परिसर आणि मागील बाजू त्याला अपवाद नाही.शिवाय तहसील कार्यालयाच्या बाजूस पालापाचोळा सर्वत्र दिसून आला आहे.मंदिराच्या मागे तहसील कार्यालयाच्या बाजूने अशीच स्थिती आहे.पश्चिम बाजूच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीलगत पालापाचोळा कचरा याचे ढीग साचलेले दिसून येत आहे.त्यामुळे या प्रशासकीय इमारतीस मोठी अवकळा निर्माण झाली आहे.

या पंचायत समितीच्या इमारतीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने माजी उपसभापती अर्जुन काळे,पंचायत समितीचे सदस्य प्रशांत वाबळे आदींनी मुंबई दरबारी मोठा पाठपुरावा करून ही नवीन व सर्व सोयींनी सुसज्ज इमारतीस काही कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता.आतील लाखो रुपयांचे फर्निचर निर्माण करून दिले आहे.त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला होता हे वेगळे सांगायची गरज नाही.मात्र पाच आकडी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी या इमारतीस भूत बंगल्यात रूपांतर केले आहे.अजून काही काळ याकडे दुर्लक्ष केले तर पंचायत समितीचे रूपांतर कचरा कुंडीत झाल्याशिवाय राहणार नाही.कोपरगाव तहसील कार्यालयात अशीच स्वच्छता निर्माण झाली होती.त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन आपली मोहीम राबवली होती.व अधिकाऱ्यांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले होते.त्यामुळे आता पंचायत समिती गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,कृषी,शिक्षण,उपअभियंता आदी अधिकारी आदीसह प्रमुख आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार हे लवकरच कळणार आहे.दरम्यान याबाबत विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी या प्रशासकराज मध्ये लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”यापूर्वीचा स्वच्छता करणारा रोजंदारीवर असलेला माणूस स्वच्छता नीट करत नसल्याने त्यास काढून टाकले आहे.दुसरा माणूस नेमला असताना त्यानेही तीच ‘ री ‘ ओढल्याने त्यालाही काढून टाकले आहे.आता नवीन माणूस शोधून लवकरच ही स्वच्छता केली जाईल अशी माहिती दिली आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”स्वच्छ भारत मिशन ‘ अंतर्गत प्रत्येक पंचायत समितीला सरकारने ०३ लाखांचा निधी दिला होता.राहाता पंचायत समितीने त्याची निविदा काढून स्वच्छता मोहीम राबवली आहे.मग कोपरगाव पंचायत समितीने या निधीचा नेमका विनियोग कुठे केला आहे ? याचा जाब विचारला आहे.