निवडणूक
…या आमदारांच्या विजयासाठी ऍड.काळेंची मोठी मदत !
न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील संघर्षमय राजकारणामध्ये आ.विठ्ठलराव लंघे यांचा विजय खेचून आणण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे प्रतिपादन आ.यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची घोडदौड सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे.राज्यात भारतीय जनता पक्षानं १४९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते.त्यातील १३२ भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.त्यामुळे जागा निवडून येण्याच्या बाबतीत आणि स्ट्राईक रेटच्या बाबतीतही भाजपा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला आहे.त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीच सत्तेत येणार असल्याचं निश्चित झालं आहे.नगर जिल्ह्यात महायुतीच्या बारा जागा निवडून आल्या आहेत.त्यात नेवासा शेवगाव मतदार संघात तिसऱ्यांदा निवडणुकीचा सामना करणारे उमेदवार विठ्ठलराव लंघे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असताना त्यांनी एक प्रसिध्दी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात त्यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांचा गौरव केला असून या श्रेयात शेतकरी संघटनेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले आहे.
त्यानी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,”ऍड.अजित (दादा) काळे गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र बरोबरच नेवासा तालुक्यात शेतकरी समस्यांकरता कार्यशील आहेत.जायकवाडी पट्ट्यातील विजेचा प्रश्न असो,जळालेले रोहित्राचा प्रश्न असो,चोरी गेलेल्या वीज वाहक तारांचा प्रश्न असो,अतिवृष्टी अनुदान,पीक विम्याचा प्रश्न असो असे अनेक शेतकरी हिताचे प्रश्न ऍड.काळे यांनी हाताळलेले आहेत.या तालुकास्तरीय प्रश्नांबरोबरच दुधाला अवघा २३ रुपये लिटर भाव असताना राज्यस्तरीय आंदोलनाची सुरुवात श्रीरामपूर येथील हरेगाव फाट्यापासून त्यांनी केली होती.त्यानंतर सरकारला ३० रुपये प्रति लिटर भाव आणि ०५ रुपये शासकीय अनुदान देणे भाग पाडले होते.यावरच न थांबता त्यांनी ४० रुपये प्रति लिटर हमीभावाचा कायदा व्हावा म्हणून प्रयत्न चालू केले आहे.दुधा व्यतिरिक्त केवळ पोर्टल बंद झाले म्हणून मागील दोन शासकीय कर्जमाफीतून हुकलेल्या शेतकऱ्यांसाठी संभाजीनगर उच्च न्यायालयात लढा देऊन राज्यातील वंचित शेतकऱ्यांना ०५ हजार ८०० कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी मिळवून दिली आहे.
याबरोबरच श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील आकारी पीडित शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी न्यायालयीन लढाई देऊन विनामूल्य सोडविला आहे.त्यासाठी ते वंचित शेतकऱ्यांसह रस्त्यावर देखील उतरले होते.अखेरीस वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि ७,५०० हजार एकर शेतजमिन सरकारी ताब्यात सुमारे ११० वर्षांपासून असलेली परत मिळणार आहे.
त्याचप्रमाणे नेवासे तालुक्यात चार मंडळे वगळलेली असताना कायदेशीर पाठपुरावा करून व उपोषणाचे हत्यार उपसून सुमारे ८८ कोटीचा पिक विमा त्यांनी मिळवून दिला आहे.तसेच २०२२ च्या नेवासे तालुक्यातील ४४३ वंचित शेतकऱ्यांना एचडीएफसी आरगो या कंपनीवर आणि प्रशासनावर वेळप्रसंगी पोलीस केसेस दाखल करून सुमारे ४२ लाख ४० हजार ३४२ रुपयांचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांकडून राज्यभरातून त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी होऊ लागली होती.त्यामुळे शेतकरी संघटनेतर्फे नेवासा विधानसभा मतदारसंघ निवडण्यात आला व त्यांचा अर्ज वाजतगाजत भरण्यात आला होता.ही उमेदवारी शेतकऱ्यांच्या प्रमुख पाच मागण्यांकरता होती.त्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी,विज बिल माफी,शेती पंपाला दिवसा वीज,हमी भावाची केंद्रे प्रत्येक ठिकाणी उभारणे,दुधाला ४० रुपये प्रति लिटर हमीभावाचा कायदा करणे आणि अन्य शेतकरी हिताच्या मागणी करता ही उमेदवारी करण्यात आलेली होती.परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मागण्यांची भूमिका घेऊन निवडणूक रिंगणात उतरले.त्यावेळी शेतकरी हित लक्षात घेऊन आणि संघटनेच्या भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांच्यात दिसून आल्याने ऍड.काळे यांनी थांबण्याची भूमिका स्वीकारली आहे.त्यांच्या या सामंजस्याने व शेतकरी हित लक्षात घेऊन थांबण्याच्या भूमिकेने आज एकनाथ शिंदे यांचे पारडे जड झाले होते तर शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असल्याचे मानले जात आहे.
यावर भाष्य करताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित काळे यांनी सांगितले की,”भविष्यात आ.विठ्ठलराव लंघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वरील सर्व शेतकरी हिताच्या मागण्यांचा आपण पाठपुरावा करणार असून नेवासा तालुक्याला सह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी हिताची भूमिका बजावणार आहे.यासाठी नेवासे तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.त्यांच्या या भूमिकेबद्दल आ.लंघे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी संघटनेचे आणि ऍड.अजित काळे यांचे आभार मानले आहे.