कोपरगाव शहर वृत्त
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा-…या नगरसेवकांची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील निवारा,रिद्धीसिद्धी नगर,जानकी विश्व,सुभद्रानगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकरे व तत्सम उपद्रवी प्राण्यांचा उच्छाद निर्माण झाला असून त्यांचा कोपरगाव नगर परिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी आरोग्य निरीक्षक सुनील आरणे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव शहराचा समावेश केंद्र सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विविध पुरस्कारात झाला आहे.या योजनेनुसार व त्या योजनेच्या निर्देशानुसार,शहर इतर अनेक उपक्रमांबरोबर मोकाट जनावरे व डुक्करमुक्त करणे बंधनकारक आहे; परंतु याबाबतीत दररोज वर्तमानपत्रात व सामाजिक संकेतस्थळावर बातम्या प्रसिद्ध होऊनही कोपरगाव पालिकेला जाग येत नाही.डुकरे पकडणे व भटकी कुत्री पकडण्यासाठी नगरपालिका बऱ्याच वेळा निविदा काढून ठेकेदार नेमते; परंतु त्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही.नगरपालिकेने या डुकरे सोडणाऱ्या व मोकाट जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करावी.शहरातील जनावरांचे गोठे शहराबाहेर हलवावेत.डुकरे पकडून जंगलात सोडावीत.कार्यवाहीला गती देऊन खास पथक नेमावे.मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघातही होतात व घाणही पसरते; तसेच अनेक वेळा वाहतूक कोंडीही होत आहे.
गतवर्षी एका घटनेत सुभाषनगर येथील महिलेला डुकराने चावा घेतला होता.त्यात दोन्ही पोटऱ्यांना गंभीर दुखापत झाली होती.सदर महिलेला उपचारासाठी येथे इंजेक्शन नसल्याने नगर येथील रुग्णालयात दाखल केले होते.त्यानंतर इंदिरापथ मार्गावर सकाळ प्रहरी फिरत असताना एका मोकाट गाईने संजीवनीं महाविद्यालयांत कार्यरत असलेले प्रा.संतोष रामराव नवले यांना मारले होते.त्या शिवाय राममंदिराजवळ अजय रेडिमेडचे संचालक अमित पोरवाल यांनाही सेवा निकेतन नजीक याच गायीने प्रसाद दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.वर्तमानात कोपरगाव शहरातील निवारा,रिद्धीसिद्धी नगर,जानकी विश्व,सुभद्रानगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकरे व तत्सम उपद्रवी प्राण्यांचा उच्छाद निर्माण झाला असून त्यांचा कोपरगाव नगर परिषदेने बंदोबस्त करावा व या परिसरातील मोकळ्या जागा स्वच्छ कराव्या अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी आरोग्य निरीक्षक सुनील आरणे यांचेकडे एका निवेदनाद्वारे शेवटी केली आहे.