अपघात
तलावात बुडून तरुणाचा मृत्यू,सर्वत्र हळहळ

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मूळ जवळके येथील रहिवासी मात्र धोंडेवाडी येथे नैमित्तिक रहिवासी असलेले शेतकरी संघटनेचे व निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिवराज निवृत्ती शिंदे यांचे नातू व शिक्षक बाळाकृष्ण शिंदे यांचे चिरंजीव प्राण शिंदे (वय-१८) याचा नुकताच धोंडेवाडी येथील पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृत तरुण प्राण शिंदे हा मुंबई येथील महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता.तो पाडव्याला सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आपल्या गावी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता.मात्र तो धोंडेवाडी येथील तलावात रांजणगाव देशमुख उर्फ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळ्यातील आलेले पाणी पाहण्याच्या उत्कंठेने गेला होता त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मृत तरुण प्राण शिंदे हा मुंबई येथील विरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट माटुंगा या महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेत पहिल्या वर्षात शिकत होता.तो पाडव्याला सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आपल्या गावी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता.मात्र तो आपल्या नातलग तरुणांसोबत धोंडेवाडी येथील तलावात रांजणगाव देशमुख उर्फ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळ्यातील आलेले पाणी पाहण्याच्या उत्कंठेने गेले होते.त्यावेळी त्याचा अचानक एका क्षणी तोल गेला होता.त्याला पोहता येत नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे समजते.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या मुंबई येथील महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रांनी त्याच्या जवळके येथील घरी धाव घेतली होती.
त्याच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उर्हे,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,माजी उपभियांता एस.के.थोरात,वाल्मीक नेहे,जवळकें ग्रामपंचायत सरपंच सारिका विजय थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात आदींनी दुःख व्यक्त केले आहे.