दळणवळण
काकडी विमानसेवेचा बोऱ्या,लोकप्रतिनिधींनी तातडीची बैठक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील आठवड्यात काकडी विमानतळावरून सुरु झालेल्या विमानसेवेमध्ये अडथळे येत असून दृश्यमानता कमी असल्यामुळे विमानांना उतरण्यास अडचणी येत आहे.काकडी विमानतळावर उतरणारे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले होते.त्यामुळे विमान प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.याची विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन काकडी विमानतळावर विविध कंपनीच्या विमानांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून विमानसेवा सुरळीत करावी अशा सूचना आ.काळे यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहे.
“राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात आली आहेत.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला उतरली कळा लागली असून येणारा दिवाळी सण,त्यांनतर नाताळ व नवीन वर्ष लक्षात घेता जगभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये विमानाने येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे.या पार्श्वभूमीवर प्रवाशांना उच्च प्रतीच्या सोयीसुविधा द्या”-आ.काळे.
जगभरातील साई भक्तांना शिर्डी येथे येण्यासाठी काकडीतील ग्रामस्थांनी जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामस्थांची मानसिक तयारी करून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.पी.अन्बलगन यांचे काळात विमानतळास जागा दिली होती.काकडी विमानतळ समर्थक कृती समितीने त्यासाठी माजी आ.काळे यांचे कालखंडात मोठे योगदान दिले होते.त्यामुळे तब्बल ४५ वर्षांनी विमानतळाच्या जागेचा शोध थाम्बला होता.
त्यामुळे काकडीसह कोपरगाव,राहाता.संगमनेर तालुक्यातील गावातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या.मात्र विमान प्राधिकरणाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे काकडी विमानतळ समस्येच्या गर्तेत अडकले आहे.अडपही काकडी विमान तळास काकडी गावाचे नाव दिले गेले नाही हे विशेष !
दरम्यान विमानतळास मोठ्या प्रमाणावर आजही अडचणी येत आहेत.आ.काळे यांनी त्यासाठी नुकतीच विमान प्राधिकरण व विविध विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत काकडी विमानतळ येथे बैठक घेतली आहे.
या बैठकीत त्यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असल्याचे वृत्त आहे.काकडी विमानतळासाठी काकडी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या जमिनी विमान प्राधिकरणाला दिल्या आहेत.विमानसेवा ठप्प झाल्यानंतर त्याचा परिणाम विमानतळ परिसरातील गावांमध्ये होतो याची जाणीव ठेवा.विमानतळावरून पूर्णक्षमतेने दिवसा व रात्री विमानसेवा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे.विमानसेवेला आज ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी टाळेबंदीच्या काळात या अडचणी का सोडविल्या नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती करून विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या अडचणी सोडवू व केंद्र शासनाच्या सबंधित अडचणी देखील सोडविण्यासाठी प्रयत्न करू आश्वासन दिले आहे.
वर्तमानात कमी दृश्यमानतेमुळे विमान उतरण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करा.नोकरीच्या संधी उपलब्ध होतील त्यावेळी स्थानिकांना प्राधान्य देवून कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे कामगारांना वेतन द्या.मल्हारवाडी ग्रामस्थांसाठी देखील पिण्याच्या पाण्याची टाकी सह पायाभूत सेवा उपलब्ध करून द्या.तसेच कराराप्रमाणे जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूलचे रखडलेले काम पूर्ण करून कार्गो टर्मिनल आराखडा तातडीने तयार करा अशा सूचना आ. काळे यांनी उपस्थित विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीसाठी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव,विमानतळ टर्मिनल मॅनेजर एस.मुरली कृष्ण,विमानतळ अभियंता कौस्तुभ ससाणे तसेच विमानतळ प्राधिकरणाचे सर्व अधिकारी तसेच इंडिगो एअरलाईन्सचे चौरे,स्पाइस जेट एअरलाईन्सचे स्टेशन मास्तर अशोक मौर्या,राजपथ इंफ्राचे विपुल बावचर आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.