दळणवळण
…’या’ रस्त्याच्या ठेकेदारावर अद्याप कारवाई नाही !
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
उत्तर भारतीयांना दक्षिण भारत व पुण्यास जाण्यास सर्वात जवळचा ठरणारा झगडेफाटा ते वडगाव पान या रस्त्याची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी राज्य सरकारकडून १० कोटी रुपयांची तरतूद करून त्याची निविदा दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध केली मात्र सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीने निकृष्ट केल्याने त्यावर एक महिन्यात खड्डे पडले होते.त्यास आता त्यानंतर १० महिन्यांनी त्यावर कोणतेही काम झाले नाहीच पण बांधकाम विभागाने ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे जवळके,धोंडेवाडी,वेस-सोयगाव,बहादरपुर,बहादराबाद,शहापूर,अंजनापुर,तळेगाव दिघे,रांजणगाव देशमुख आदी गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
भांडवली गुंतवणूक आणि उद्योगाचा विकास हवा असेल तर चांगल्या पायाभूत सुविधा हव्या आहेत.पाणी,वीज,वाहतूक आणि दळणवळण याशिवाय आपण शेती,सेवा आणि उद्योगाचा विकास करू शकत नाही.पायाभूत सुविधांशिवाय पर्यटनाचा विकास होऊ शकत नाहीअसे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हंटले होते.मात्र याला उत्तर नगर जिल्हा अपवाद असावा असे दिसत आहे.कारण येथे रस्ते विकासाचा निधी हा ठेकेदार आणि अधिकारी यांची चिरीमिरी करण्यासाठी असतो असा गोड गैरसमज पसरलेला दिसून येत आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांच्या कामाबाबत कोटींची उड्डाणे दिसत असली तरी वास्तव हे आहे की या रस्त्यांचा रस्ता निकृष्ट असून त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका वारंवार दिसून येत आहे.नजीकच्या तालुक्यातील रस्ते मात्र मोठ्या प्रमाणावर समृद्ध झाले असल्याचे दिसत आहे.त्यात मराठवाड्यातील तुलनेने मागास असलेल्या वैजापूर तालुका आणि येवला तालुका वरचढ ठरताना दिसत आहे.शेजारी संगमनेर,सिन्नर,निफाड तालुक्यातील कोणतेही रस्ते नादुरुस्त असल्याचे दिसत नाही.मात्र राजकारणात भलत्याच पुढारलेल्या अ.नगर जिल्ह्यातील प्रवेश केला की वाहतूकदारांना नगर जिल्ह्यात आल्याची चाहूल लागते ती मोठमोठ्या खड्डयांनी.त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या तोंडी नेते आणि प्रशासन यांना देण्यासाठी शेलकी विशेषणे न आली तर नवल.आता तीच अवस्था नगर-मनमाड रस्ता असो की तळेगाव मार्गे संगमनेर रस्ता असो की पढेगाव मार्गे वैजापूर,कोपरगाव-कोळपेवाडी रस्ता असो.त्यामुळे प्रवासी आणि प्रवासी वहांनासह अवजड वाहन चालक त्रस्त असल्याचे वारंवार दिसून येत आहे.मात्र त्यावर उतारा शोधायला कोणालाही वेळ असल्याचे दिसत नाही.गत उन्हाळ्यात १० कोटी रुपये रस्त्याच्या कामावर खर्च होऊनही राज्य मार्ग क्रं.६५ या रस्त्याची एका पावसाळ्यात वाट लागली आहे.
झगडे फाटा,अंजनापूर,रांजणगाव देशमुख आदी शिवारात अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही तर झगडे फाटा ते जवळके हद्दी पर्यंत तो काम होऊनही उखडला आहे.मोठ्या प्रमाणावर खचला आहे.काही ठिकाणी मुरूम टाकण्याचा पराक्रम बांधकाम विभागाने केला होता.मात्र तो मुरूम आता कुठेही दिसत नाही.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याबद्दल कोणती कारवाई केली हे उघड होणे गरजेचे आहे.नसेल तर ती का होत नाही त्यासाठी कोण आडवे येत आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे यांचेशी संपर्क साधला असता त्यानी या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभगाचे संगमनेर येथील कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांनी नुकतीच भेट दिली असल्याचे सांगून ठेकेदार,’जगताप कन्स्ट्रक्शन’ वर दंडाची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती दिली आहे.
याबाबत शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे नुकतेच जवळके जनमंगल ग्रामविकास संस्थेने लोकसभा निवडणुकीपूर्वी लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी याबाबत काही महिन्यापूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन लक्ष वेधून निधीची मागणी करून सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्याची मागणी केली आहे.मात्र त्यावर काय कारवाई झाली हे स्पष्ट झालेले नाही.