दळणवळण
…हा तालुका राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर येणार-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शहापूर घोटी विशाखापट्टणम या राज्य मार्गाला ( राज्यमार्ग क्रमांक-५०) राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करून या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे असा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने केंद्राकडे सादर करण्यात आला असल्याने नेवासा तालुक्यातील कुकाणा हे गाव राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
“शहापूर घोटी विशाखापट्टणम या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा यासाठी आपण व तत्कालीन खा.दिलीप गांधी आम्ही दोघांनी वेळोवेळी केंद्राकडे पाठपुरावा केला या मार्गाचा प्रस्ताव केंद्राकडे गेल्याने रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या मार्गास,’भारतमाला योजना’ दोन मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे”-भाऊसाहेब वाकचौरे,माजी खासदार,शिर्डी.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”शहापूर-घोटी विशाखापट्टणम (अकोले संगमनेर श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई मार्गे ) या राज्य मार्गाला केंद्र सरकारकडून २०१७ मध्ये नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मान्यता मिळाली होती.या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित होण्यासाठी माजी खा. दिलीप गांधी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे आदीनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने यावर कार्यवाही करून दि. २०सप्टेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.यावर राज्य शासनाच्या वतीने ही कार्यवाही पूर्ण होऊन दि.९ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता.
“शहापूर घोटी विशाखापट्टणम या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होण्यासाठी मी व या मार्गावरील सर्व आमदारांना सोबत घेऊन वेळोवेळी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यास तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद होत आहे”-बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार,नेवासा विधानसभा.
अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या कल्याण- विशाखापट्टणम तसेच शहापूर-घोटी-विशाखापट्टणम हे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत.पैकी कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम बीड जिल्ह्यातील गेवराई पर्यंत पूर्ण झालेले आहे.त्यामुळे घोटी विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाला गेवराई जिल्हा बीड येथे जोडावयाचे आहे.शहापूर-घोटी-विशाखापट्टणम या मार्गावर औद्योगिक कृषी तसेच साखर कारखाने जास्त प्रमाणात असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रक,ट्रॅक्टर व हा मार्ग पठारी भागातून जात असल्याने अवजड मालाची वाहतूक करणारे ट्रक,कंटेनर याच रस्त्याचा वापर करतात तसेच या मार्गावर शिर्डी शनि-शिंगणापूर,देवगड,नेवासा,औंढा-नागनाथ,माहूर,तिरुपती बालाजी इत्यादी देवस्थान असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.वाहतुकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हा राज्यमार्ग अपुरा पडत आहे.राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे रियल इस्टेट,प्लॉटिंग,हॉटेलिंग व अन्य व्यावसायिकांना सुगीचे दिवस येणार आहेत.शेत जमीन व अन्य जागांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मुंबईला नेण्यासाठी सुलभता येणार आहे.