धार्मिक
सायकल यात्रेतून पर्यावरणाचा संदेश-सूर्यवंशी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सायकल चालवणे,जे व्यायाम,वाहतुकीचे साधन आणि मनोरंजनासाठी एक उत्तम पर्याय आहे;यामुळे आरोग्य सुधारते,प्रदूषण कमी होते,खर्च वाचतो आणि ते सर्व वयोगटांसाठी सोयीचे आहे,ज्यामुळे ते कमी-प्रभावी,मजेदार आणि पर्यावरणास अनुकूल ठरते.हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य,वजन कमी करणे आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले असल्याचे प्रतिपादन जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

"पिंपळगाव जलाल येथील युवकांनी सायकलवर तुळजापूर अक्कलकोट प्रवास करून एक चांगला पायंडा सुरू केला आहे.आजचा युवक सोशल मीडिया व मोबाईलमध्ये अधिक अडकत चालला असून त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.प्रत्येकाने सायकलिंग व इतर व्यायाम प्रकारांचा अवलंब करून निरोगी जीवनशैली स्वीकारली पाहिजे"-नंदकुमार सूर्यवंशी,अध्यक्ष,जंगली महाराज आश्रम,कोकमठाण.
पिंपळगाव जलाल येथील जयभवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने तुळजापूर-अक्कलकोट सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या सायकल यात्रेच्या प्रवासादरम्यान यात्रेकरूंनी नुकतीच आत्मा मालिक ध्यानपीठ,कोकमठाण येथे सदिच्छा भेट दिली आहे.या वेळी ध्यानपीठाच्या वतीने संत व विश्वस्त तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी सायकल यात्रेतील सहभागी सदस्यांचे स्वागत केले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी आत्मा मालिक ट्रस्टचे संत विश्वानंद महाराज,ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,विश्वस्त प्रदीपकुमार भंडारी, जयभवानी संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे,न्या.डॉ.विक्रम आव्हाड,डॉ.पूजा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सायकल ही युरोपीय देशात आणि शहरांमध्ये वाहतुकीसाठी प्रभावी साधन मानले जाते मात्र अलीकडील काळात या साधनाकडे नागरिकांचे आणि तरुणाचे दुर्लक्ष होत आहे.मात्र पिंपळगाव जलाल येथील युवकांनी सायकलवर तुळजापूर अक्कलकोट प्रवास करून एक चांगला पायंडा सुरू केला आहे.आजचा युवक सोशल मीडिया व मोबाईलमध्ये अधिक अडकत चालला असून त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.प्रत्येकाने सायकलिंग व इतर व्यायाम प्रकारांचा अवलंब करून निरोगी जीवनशैली स्वीकारली पाहिजे.”त्यांनी आपल्या बालपणीच्या सायकल चालवण्याच्या आठवणींना उजाळा देत जयभवानी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले.जयभवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दररोज २० किमी सायकल प्रवास,बालविवाह प्रतिबंध,पर्यावरण जागरूकता तसेच ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ हे उपक्रम सातत्याने राबवत असल्याची माहिती सांगून त्यांचे शेवटी कौतुक केले आहे.



