धार्मिक
वारकरी संप्रदायाचे भक्ती चळवळीतील स्थान अढळ- मिरीकर

न्युजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
भक्ती चळवळीची पताका संतांनी खांद्यावर घेऊन वेगवेगळे तत्वज्ञान समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला असला तरी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने भक्ती चळवळीतील आपले स्थान आजतागायत अढळ ठेवलेले असल्याचे विचार ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे आयोजित किर्तनाद्वारे व्यक्त केले आहे.

“धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी, तिला नीती व तत्वज्ञानाची जोड प्रत्येक धर्माने दिली पाहिजे.अनासक्त माणसांनी लोकोध्दाराच्या कार्यात समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे”-ह.भ.प.विनायक महाराज वाघ.
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किर्तनातून ह.भ.प.मीराबाई मिरीकर भावीक श्रोत्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
गोदावरी नदीमध्ये ऋषीपंचमीनिमित्त लाखो महिला भाविकांनी स्नानांची पर्वणी साधली.त्यानंतर ह.भ.प.मिरीकर यांचे शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात किर्तन आयोजित करण्यात आले होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाल्या की,”रामदासी महाराज व नामदेवराव परजणे यांना दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सरला येऊन किर्तन सेवा देण्याचे वचन आपण दिलेले आहे. त्या वचनाची प्रतारणा होऊ नये म्हणून आजही संवत्सरला येऊन किर्तन सेवा देत असल्याचे मीराबाई यांनी यावेळी सांगताच उपस्थित सर्वच श्रोते भाऊक झाले होते.संतांनी आपल्या आचार विचारातून मानवी मूल्यांचा मांडलेला विचार आदर्शवत असल्याने लोकजीवनावर त्या विचारांचे चांगले संस्कार झालेले आहेत.’जनी जनार्दन’ या सहज विचारातून सामाजिक प्रगतीचा देखील संतांनी विचार केलेला आहे.वारकरी सांप्रदायाने ज्ञानाचे महत्व मान्य करून भक्तीला अग्रस्थान दिलेले आहे.त्यासाठी नामसंकीर्तनासारखे अतिशय सोपे साधन लोकांना उपलब्ध करून दिले.आपल्याकडे आध्यात्मज्ञानाची आणि साधनेची परंपरा तशी खूप प्राचिन आहे.तत्वज्ञान आणि जीवन जगण्याच्या पध्दतीला ही परंपरा पुरक आहे.समाजव्यवस्थेचे खरे चित्र या परंपरेतूनच स्पष्ट होते. समाजातील विषमता दूर सारून सामाजिक व पारमार्थिक वाटा स्वच्छ करण्यासाठी देखील या परंपरेचे मौलिक योगदान आहे.आजच्या धावपळीच्या परिस्थितीत आध्यात्माबरोबरच विज्ञानाची आवश्यकता नक्कीच आहे.परंतु अलिकडे विज्ञानाचा विपर्यास मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो.नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना आपल्या सभोवतालचे सुंदर जगच माणूस विसरत चालला आहे.माणुसकी मृतवत झाली आहे.यातून सावरायचे असेल तर संतांच्या चरित्रांचे वाचन आजच्या पिढीने केले पाहिजे. रोजच्या व्यावहारिक जीवनात आध्यात्मालाही महत्व देऊन व्यवहारिक कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषक ठरतील अशीच कर्मे माणसाने केली पाहिजेत.

ह.भ.प.विनायक महाराज वाघ यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र ही संतांची पवित्र व पावन भूमी आहे.संस्काराचा संपन्न व समृध्द वारसा या भूमीने मराठी मनाला दिलेला आहे.वारकरी सांप्रदायामध्ये व्रत, वैकल्याचे स्तोम नाही.कर्मठपणाही नाही.तर त्यात त्याग,भोग, स्वधर्माचरण यांचा सुरेख मेळ घालण्याचा उपदेश आहे.अद्वैत भक्ती, ज्ञान,उपासना श्रध्दा आणि विवेक यांच्या एकात्मतेवर संतांनी अधिक भर दिलेला असून त्यांची वृत्ती नेहमीच लोकाभिमूख होती असे सांगून वाघ महाराज यांनी पुढे सांगितले की,”धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी, तिला नीती व तत्वज्ञानाची जोड प्रत्येक धर्माने दिली पाहिजे.अनासक्त माणसांनी लोकोध्दाराच्या कार्यात समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे हीच शिकवण वारकरी सांप्रदायाने आपल्याला दिलेली आहे.हा सांप्रदाय प्रत्येकाने अंगिकारण्याची आवश्यकता आहे.

ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केलेली होती.समाधानकारक पावसामुळे यंदा नदीला दुथडी भरुन पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता.
प्रारंभी गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी ग्रामस्थांच्यावतीने मीराबाईंचा सत्कार करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रकृती स्वास्थ्य नसतानाही मीराबाईंनी संवत्सरला येवून किर्तन सेवा दिली.कीर्तनापूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मीराबाईंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केलेली होती.समाधानकारक पावसामुळे यंदा नदीला दुथडी भरुन पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता.त्यातच किर्तन श्रवणाचा लाभ मिळत असल्याने संभाजीनगर,नाशिक,अहिल्यानगर अशा विविध ठिकाणावरून भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली आहे.