धार्मिक
…या गावात संत सावता महाराज यांची पुण्यतिथी होणार !

न्युजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सरमध्ये सावता माळी महाराज पुण्यतिथी नऊचारी येथील महाराष्ट्र माळी समाज महासंघ सावता महाराज प्रेमी मंडळींच्या सहकाऱ्याने श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा उद्या दि.२३ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नऊचारी येथील महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल हरीभाऊ सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधींस दिली आहे.

“आमची माळियाची जात,शेत लावू बागाईत” असे संत सावता महाराज एका अभंगात म्हणतात.ऐहिक जीवन कर्तव्यकर्मे करत असताना काया-वाचे-माने ईश्वरभक्ती करताना, हा अधिकार प्राप्त आहे.’न लगे सायास,न पडे संकट,नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता.त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग शोधला.उद्या त्यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होत आहे.
संत सावता माळी (जन्म: १२५०,मृत्यू:१२९५) हे एक वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध संत आणि कवी होते.ते महाराष्ट्रातील अरण (तालुका-माढा,जिल्हा-सोलापूर) येथे राहणारे एक माळी होते.त्यांना ‘क्रांतिसूर्य’ म्हणूनही ओळखले जाते.त्यांनी ‘कांदा-मुळे’ या भाजीपाल्यामध्येही भगवंताचे दर्शन घडते,असे सांगितले जाते.त्यांनी आपल्या विठ्ठल भक्तीने राज्यात ओळखले जातात.त्यांची पुण्यतिथी राज्यात मोठ्या भक्ती भावाने भाविक साजरी करतात. संवत्सर येथेही उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
या सोहळ्या निमित्ताने ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव यांचे जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.तरी ज्ञानामृत श्रवणाचा व महाप्रसाद जास्तीत-जास्त भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंडळ,परीवार व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष मुकुंद काळे यांनी शेवटी केले आहे.