जाहिरात-9423439946
धार्मिक

माणसाने संतांची तत्त्वे अंगिकारावी-चैतन्य महाराज

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर-(वार्ताहर)

   माणसाला स्वतःचे स्वतःला कौतूक वाटेल अशी स्वतःची प्रतिष्ठा व मान -सन्मान प्राप्त करायचा असेल तर संत विचारांची मौलिक तत्त्वे आत्मसात केली पाहिजेत असे प्रतिपादन भांबोली येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगर येथील ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

  

”तरुणपणातील आत्महत्या रोखण्यासाठी आणि भरकटलेल्या विचाराला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी तरुणांना संत विचारांची नितांत गरज आहे.यासाठी संत साहित्य वाचले पाहिजे”- ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर,भामचंद्र डोंगर.

   संवत्सर येथील गोदावरी काठावरील श्री शृंगेश्वर ऋषींच्या मंदिरात श्री गणेश व श्री शृंगेश्वर ऋषी यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा विधी तसेच मंदिरावर नवीन कलशारोहन सोहळा नुकताच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प.पूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला आहे.स्व.नेते नामदेवराव परजणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे सुपूत्र गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी श्री शृंगेश्वर मंदिरातील शिवपिंडीला नऊ किलो तांब्याचे आवरण अर्पण केले.पाच दिवस सुरु असलेल्या या सोहळ्याच्या सांगता समारंभात चैतन्य महाराज वाडेकर यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

   संवत्सर गावाला पौराणिक महत्व तर आहेच परंतु देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला संत विचारांचाही अलौकीक वारसा लाभला आहे.या गावाचे नेतृत्व करणारे स्व.नामदेवराव परजणे यांनी संवत्सर गावाला धार्मिक,सांस्कृतिक पंढरी म्हणून ओळख निर्माण करुन दिलेली आहे.त्यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य ग्रामस्थ एकोप्याने करीत आहेत हे संवत्सरचे खास वैशिष्ट्य आहे.

   संवत्सरचे नांव ऐकून होतो परंतु आज प्रत्यक्ष या गांवात येण्याचा योग आला ही माझ्यादृष्टीने भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून चैतन्य महाराज पुढे म्हणाले,जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची गाथा आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांचे पारायण करणे हा आपला संस्कार आहे.तर प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घेणे हा जीवनाच्या उदात्ततेचा भाग आहे.आयुष्य कसे जगावे हे गाथा सांगते तर,आयुष्यातील समस्यांचे निवारण कसे करावे हे ज्ञानेश्वरी शिकवते. आजच्या तरुण पिढीसाठी गाथा आणि ज्ञानेश्वरी प्रेरणा आहेत.

   तरुणपणातील आत्महत्या रोखण्यासाठी आणि भरकटलेल्या विचाराला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी तरुणांना संत विचारांची नितांत गरज आहे.यासाठी संत साहित्य वाचले पाहिजे असे सांगून चैतन्य महाराज पुढे म्हणाले,संत साहित्य आत्मसात केल्याने जीवनाची परिपूर्णता साध्य करता येते.संत वाडःमय खरे तर आपल्या जगण्याचे व्यवस्थापन आहे.संतांनी आपल्यासाठी विचारांचे मोठे भांडार खुले करुन दिलेले आहे.परंतु आपले त्याकडे लक्षच नाही.निरर्थक गोष्टीकडे माणूस वळत चालला आहे.नको त्या गोष्टींना महत्व दिल्याने माणसा माणसांमध्ये खूप मोठी विषमतेची दरी निर्माण होत चालली आहे.परस्परांपासून माणूस लांब चालला आहे.संवाद खुंटल्याने विसंवादाच्या भिंती एकमेकांमध्ये निर्माण होत असल्याची खंत व्यक्त करुन चैतन्य महाराज यांनी संतांचे विचार आणि मानवी जीवन याविषयी विवेचन केले.

   सुमारे ४० वर्षापूर्वी स्थापीत करण्यात आलेली श्री शृंगेश्वर ऋषींची पूर्वीची मूर्ती भंग पावल्यामुळे ती मिरवणुकीने गोदावरी नदीमध्ये विसर्जीत करण्यात आली.आता नव्याने या मूर्तीसोबतच श्री गणेश मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडला.मूर्ती व कलशाची शोभायात्रा शांतीसुक्त,प्रधान संकल्प,गणेश पूजन तसेच जलाधिवास,मंडप पूजन,अग्नी मंथन,ग्रह पूजन,मंगल आरती.आशीर्वाद,प्रातःपूजन,प्रधानहवन,स्थापनविधी, न्यासविधी,धान्ययाग,निद्रावाहनम,सायंपूजन,उत्तरांग हवन,बलिदानविधी,मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा,पूर्णाहुती,महाआरती ब्रम्हवृंद सत्कार असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत.अखेरच्या दिवशी काल्याच्या किर्तनाने आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.ग्रामपुरोहीत शैलेश जोशी गुरुजी यांनी या संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य केले. विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय संस्थांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

सदर प्रसंगी प्रारंभी राजेश परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.ग्रामस्थांच्यावतीने चैतन्य महाराजांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close