धार्मिक
….या गावात हरिनाम सप्ताहाची सांगता
न्युजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.बोलकी येथील ह.भ.प.भानुदास महाराज बोलकीकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर आमटी भाकरीच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.भजन,किर्तन,श्रीकृष्ण चरित्र आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी गेले सात दिवस संवत्सरगांव गजबजून गेले होते.
प.पू.वै.रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या तीस ते पस्तीस वर्षांहून अधिक काळापासून संवत्सरगांवात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.त्यात ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.गोदावरी दूध दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,उपसरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा हा सोहळा पार पडला आहे.
काल्याच्या किर्तनातून भानुदास महाराज यांनी श्रीकृष्ण चरित्रावर विचार व्यक्त केले.श्रीकृष्णासारखा सर्वतोपरी अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय पण संपूर्ण विश्वात आजवर झाला नाही.अलौकीक पराक्रम,अप्रतिम बुध्दीमत्ता,असामान्य स्वार्थत्याग अंगी बाणलेला असा हा अवतारी पुरुष प्रत्येकाच्या मनात परमेश्वराचा अवतार म्हणून ठाई ठाई विराजमान झालेला आहे.श्रीकृष्णाचे चरित्र अत्यंत दिव्य असून कृष्णलीलांचे वर्णन शब्दातून व्यक्त करता येणार नाही. त्यासाठी श्रीकृष्ण चरित्रात एकरुप व्हावे लागेल. ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल त्यावेळी मी पुन्हा अवतार घेईन आणि धर्मरक्षण करेल असे भगवान श्रीकृष्णाने गीतेमधून सांगितले आहे.श्रीकृष्णाने सांगितलेली गीता म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचे सार आहे.कसे जगावे,कसे वागावे याचे सुंदर मार्गदर्शन गीतेतून मिळते असे सांगून भानुदास महाराज यांनी संवत्सर येथे आयोजित केल्या गेलेल्या सप्ताहाच्या निटनेटक्या नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतूक करुन हा सोहळा भविष्यातही असाच अखंडपणे सुरु रहावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी हरिनाम सप्ताहाच्या आयोजनाबाबत ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. येत्या ८ सप्टेंबर रोजी ऋषिपंचमीला मीराबाई मिरीकर यांचे किर्तन आयोजित केलेल असून त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सप्ताह कालावधीत संवत्सरसह कोकमठाण,सडे,वारी,कान्हेगांव,धोत्रे,भोजडे,खोपडी,दहेगाव बोलका,लौकी,तळेगांवमळे,घोयेगांव, उक्कडगांव, कासली, शिरसगांव, तिळवणी, पढेगांव आदी गांवातील भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.संवत्सर परिसरातील रामवाडी,लक्ष्मणवाडी,दशरथवाडी,बिरोबा चौक या ठिकाणच्या भजनी मंडळांनी पहारा दिला.संवत्सर येथून शिंगणापूर येथे बदली झालेले तलाठी श्री लहाने यांचा तर त्यांच्या जागी संवत्सर येथे नव्याने रुजू झालेल्या तलाठी सौ. वाडेकर यांचा भानुदास महाराज यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी काल्याच्या किर्तनानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात भाविकांनी आमटी भाकरीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेश आबा परजणे फौन्डेशन व मित्रमंडळाच्या सदस्यांसह नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय,जनता हायस्कूल,ग्रामपंचायतीचे कर्मचारी,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी आभार व्यक्त केले.