धार्मिक
कोपरगावात राम मंदिर आणि संतापेक्षा नेत्यांच्या प्रतिमा मोठ्या !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात येत असून अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील साधू-संतांचे पूजन आ. आशुतोष काळे करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान अयोध्या येथे आगामी २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अयोध्या नगरीत जय्यत तयारी सुरू असतांना देशभरातून साधू संत आणि भाविक भक्त या सोहळ्यासाठी आतुर झाले आहे.मात्र कोपरगावात मात्र रामापेक्षा नेते आणि त्यांच्या प्रतिमा मोठ्या झाल्याचे शहरातील बॅनरबाजीवरून दिसत असून त्यात,मात्र साधुसंत कोठेही दिसत नाही हे विशेष !त्यामुळे हा सोहळा साधू संतांचा की नेत्यांचा असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.तर नगरपरिषदेने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.
अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे.२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार सून १६ जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात होणार आहे.प्राणप्रतिष्ठेचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणे.वेद आणि पुराणांमधील विविध परंपरांनुसार हा विधी पार पाडला जातो.त्यासाठी देशभरातून साधुसंत हजेरी लावणार आहे.त्याची तयारी कोपरगावातही मोठ्या उत्साहात सुरु आहे.त्यासाठी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी बुधवार दि.१७ जानेवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अयोध्या नगरीत जय्यत तयारी सुरू आहे.या भव्य,दिव्य आणि नयनरम्य सोहळ्यासाठी देशभरातील अनेक संत-महंतांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले असून अभूतपूर्व असणाऱ्या या सोहळ्याची सर्वजण आतूरतेने वाट पाहत आहेत.
यामध्ये कोपरगाव मतदार संघातील साधू-संतांना देखील निमंत्रण देण्यात आली आहेत.यामध्ये श्री क्षेत्र सराला बेटचे उत्तराधिकारी महंत रामगिरीजी महाराज व कोपरगाव बेट येथील रमेशगिरि महाराज तसेच मतदार संघातील साधू-संतांचे कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने आ.काळे विधिवत पूजन करणार आहेत.त्या निमित्ताने इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सुरेल आवाजात प्रभू श्रीरामाचे गुणगान गाणार आहे.तसेच सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेती गौरी पगारे व सुरभी कुलकर्णी या गायिका देखील उपस्थित राहून प्रभू श्रीरामाचे गुणगान गाणार आहेत.या कार्यक्रमासाठी तमाम रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.