धार्मिक
दृष्टाचा नाश,भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवंत घेतात अवतार-…या महंतांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
जगात दृष्टाचा नाश,भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेत असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र जवळके येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

जवळके ग्रामस्थ यांनी उभारलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे व त्यासाठी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनीं दिलेल्या योगदानाचे तोंडभरून कौतुक केले आहे.गाव छोटे असले तरी त्यांचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असल्याचे प्रमाणपत्र देऊन सदर सेवेकरी सराला बेटात अनेक वर्ष आपली सेवा देत असल्याबाबत गौरवोद्गार काढले आहे.
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र जवळके येथे मिती अश्विन शुद्ध सोमवार दि.१६ ऑक्टोबर या दिवशी सुमारे १३-१४ लाख रुपये खर्चून श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात गोदावरी धाम येथील महंत रामगिरीजी महाराज यांचे शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी श्री क्षेत्र सराला बेटाचे ह.भ.प.मधुकर महाराज यांचेसह संजीवनी संचालक अरुण येवले,जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पत्रकार नानासाहेब जवरे यांचेसह जवळके,धोंडेवाडी व जवळके पंच क्रोशीतील भाविक भक्त,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी आपल्या कीर्तन सेवेसाठी संत तुकाराम यांचा,
“उभारिला हात । जगी जाणविली मात ।।१।। देव बैसले सिंहासनी ।
आल्या याचका होय धनी ।।२।। एकाच्या कैवाडे । उगवे बहूतांचे कोडे।।
हा संत तुकाराम यांचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला होता.
त्यावेळी पुढे बोलताना ते प्रारंभी त्यांनी,विठोबा शब्दाची उत्पत्ती अत्यंत सोप्या भाषेत केली असून ‘तो’ असा की,’वि’ म्हणजे,’ज्ञान’, ‘ठोबा’ म्हणजे,’आकार’ -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे ‘विठोबा’ किंवा वि म्हणजे गरूड आणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे.श्रीकृष्ण,श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच मानले जातात.त्या विठ्ठलास पंढरपुरास ज्यांना जाता येत नाही त्यांची गावीच सोय करण्यासाठी गावोगावी विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे उभी राहिली असल्याचे आपल्याला दिसून येते.असेच मंदिर वर्तमानात जवळके येथील ग्रामस्थानीं उभे केले आहे.

सदर प्रसंगी उच्च श्रेणीतील मान्यवर देणगीदार यांचे हस्ते प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे विधिवत पूजन ब्रम्हवृंद यांचे उपस्थितीत केले आहे.
पुढे बोलताना तें म्हणाले की,”मंदिर शब्दाचा अर्थ ‘मं’ चा अर्थ मंगल,’दि’ चा दिव्य,’र’रम्यता म्हणजे मंदिर.अंतःकरणात देवत्व आहे.अंतःकरणात भाव होता म्हणून संत नामदेवांनी नैवद्य खाण्यासाठी परमेश्वराला प्रकट व्हावे लागले असल्याचे सांगितले आहे.त्याच वेळी त्यांनी या श्रेणीतील राजस्थान मधील आई-वडील गावाला गेल्यावर संत कर्माबाईस यांचे उदाहरण दिले असून त्यांना नैवद्य ठेवण्याची जबाबदारी दिली त्याची कथा सांगितली असून देवावर भाव असल्याशिवाय देव दिसत नसल्याचे सोदाहरण देऊन स्पष्ट केले आहे.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”भगवंत यांचेकडे जो मागतो त्याची इच्छा पूर्ण करतो मात्र जो काहीच मागत नाही त्यास त्याला तो सर्व सुखाचा स्वामी करतो.भक्ताला अभय देण्यासाठी कटेवरी हात ठेवले आहे तर माझ्या भक्तासाठी नाभिकडे अंगुष्ट निर्देश करून ब्राम्हलोक किती दूर आहे हे दर्शविण्यासाठी ही कृती केली आहे.तो भक्ताचे सर्व संकल्प भगवान पूर्ण करतो.मंदिर बांधणे सोपे पण पुढे धूप,दीप भजन कीर्तन करणे कठीण असून ते भावी काळात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
..’तो’ भक्तांच्या हाकेसरशी धावून येतो त्यासाठी त्यांनी महाभारतातील द्रोपदी व कौरव सभेचे उदाहरण दिले आहे.व द्रौपदीच्या रक्षणासाठी भगवान श्री कृष्ण धावून आले असल्याचे उदाहरण दिले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”संतांचे दोन कामे आहे भक्ताला सदमार्ग दाखवणे आणि परमेश्वराचा निरोप देण्याचे काम संत करतात.असे सांगून जवळके ग्रामस्थ यांनी उभारलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे व त्यासाठी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनीं दिलेल्या योगदानाचे तोंडभरून कौतुक केले आहे.गाव छोटे असले तरी त्यांचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असल्याचे प्रमाणपत्र देऊन सदर सेवेकरी सराला बेटात अनेक वर्ष आपली सेवा देत असल्याबाबत गौरवोद्गार काढले आहे.
सदर प्रसंगी त्यांनी उपस्थित कार्यकर्ते,भजनीमंडळ आदींचे शाल श्रीफळ देऊन गौरव केला आहे.शेवटी त्यांनी आगामी काळात श्री क्षेत्र सराला बेटात दुर्गाष्टमीला होम असतो त्याला सर्व भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन महंत रामगिरीजी महाराज यांनी शेवटी केले आहे.दरम्यान सदर प्रसंगी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.उपस्थितांचे आभार आयोजकांनी मानले आहे.