धार्मिक
…या सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पढेगाव सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी गावाने अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा जपत मोठ्या भक्तीभावाने सात दिवस,’अखंड हरिनाम सप्ताह’ मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे.आज व्दादशीला ह.भ.प.आचार्य दिपक महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
अनादी काळापासून वारकरी सांप्रदायाशी नाळ जोडलेल्या या गावात वै.प.पू.गंगागिरी महाराज वै.प.पू.नारायणगिरी महाराज यांचे आशीर्वादाने व वारकरी संप्रदायाचा वारसा चालविणारे वै.ह.भ.प.पंढरीनाथ महाराज शिंदे,वै.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज शिंदे,वै.ह.भ.प.भास्कर महाराज दाणे यांचे प्रेरणेने त्यांचे पश्चात गावाने हा वारसा अखंडपणे पुढे चालुच ठेवला आहे.त्यामुळे गावात अनेकांना भजनाचा आणि गायनाचा छंद तर लागलाच शिवाय नवोदित कीर्तनकार,प्रवचनकारही या सप्ताहाच्या तालमीत चांगल्या प्रकारे तयार झाले आहे.
गेली आठ दिवसांत अखंड हरिनाम सप्ताहात नामवंत कीर्तनकारांनी रात्री सात ते नऊ कीर्तन सेवा दिल्यानंतर दैनंदिन मिष्ठान्न प्रसाद भोजनाच्या पंगतीचा दररोज हजार ते पंधराशे भाविक लाभ घेत होते.रात्रंदिवस भजन आणि काल्याच्या पुर्व प्रभातवेळी श्रीमान माधव कृष्ण प्रभूजी श्रीब्रजधाम (हरेकृष्ण मंदिर ) कोटमगाव यांच्या भजनाने गाव हरिनामात दुमदुमले होते.आज काल्याचे कीर्तन आटोपल्यानंतर समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असुन,याचा पंचक्रोषीतील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.