कृषी विभाग
आरोग्यदायी जीवनासाठी भरडधान्यासोबत नियमित योगाभ्यास गरजेचा-माहिती
न्यूजसेवा
शिर्डी-(श्रीरामपूर)-
आरोग्यदायी जीवनासाठी दैनंदिन आहारामध्ये भरडधान्याचा नियमित समावेश असला पाहिजे.त्याचबरोबर प्रत्येकाने पंधरा मिनिटे योगाभ्यास केला पाहिजे असे मत श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी आज येथे व्यक्त केले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन तर २०२३ हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे.या प्रदर्शनाच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरात सांस्कृतिक कार्यक्रम,निबंध,चित्रकला व रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे”-माधव जायभावे,केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो (अहमदनगर) इंडियन रेड क्रॉस सोसायटी (श्रीरामपूर) व श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या संयूक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य ) वर्ष २०२३” निमित्त श्रीरामपूर येथे १९ ते २१ जून कालावधीत मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री.कानडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
“योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.आजारातून बरे करण्याची शक्ती रसायनमुक्त धान्यात आहे. विषयुक्त शेतीकडे न जाता सेंद्रिय शेतीकडे आपला प्रवास झाला पाहिजे.देशाने पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाकडे प्रवास सुरू केला आहे”-लहू कानडे.आमदार श्रीरामपूर.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने,उपविभागीय अधिकारी किरण सावंत,गटविकास अधिकारी प्रविण शिनारे,माहिती प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये,सहायक प्रचार अधिकारी पी. कुमार,तालूका कृषी अधिकारी अशोक साळी,माहिती अधिकारी सुरेश पाटील,इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन तथा प्राचार्य सुनिल साळवे,सामाजिक कार्यकर्ते अरुण नाईक,बचत गट प्रमूख श्री.गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार श्री.कानडे म्हणाले,योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.आजारातून बरे करण्याची शक्ती रसायनमुक्त धान्यात आहे. विषयुक्त शेतीकडे न जाता सेंद्रिय शेतीकडे आपला प्रवास झाला पाहिजे.देशाने पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाकडे प्रवास सुरू केला आहे.
श्रीमती जगधने म्हणाल्या,भरडधान्य व योग याविषयावर शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. नागरिकांनाही भरडधान्याचे आहारातील महत्त्व पटवून सांगितले पाहिजे.
श्री.जायभावे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन तर २०२३ हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे.या प्रदर्शनाच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरात सांस्कृतिक कार्यक्रम,निबंध,चित्रकला व रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.२१ जून रोजी आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक वाचनालय व ग्रंथ संग्रहालय येथे भरविण्यात आलेल्या हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत हे खुले राहणार आहे.नागरिकांना या विनामूल्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री.जायभावे यांनी केले आहे.
या प्रदर्शनात भरडधान्याचे विविध प्रकार,त्यांचे आरोग्यातील महत्त्व तसेच विविध योग प्रकारांविषयी सचित्र माहिती मांडण्यात आली आहे.तसेच श्रीरामपूर मधील विविध बचतगटांनी भरडधान्यापासून बनविलेल्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.यावेळी स्थानिक कलापथकाचा जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आबालवृद्धांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली आहे.