संपादकीय
आपल्याच सवंगड्याचा विश्वास गमावणारी “ग्रामपंचायत निवडणूक”
जनशक्ती न्यूजसेवा
(नानासाहेब जवरे)
अहंपणामुळे बऱ्याचदा राज्यकर्त्यांकडून बोलण्याच्या ओघात असे काही शब्द निघतात की जे त्या व्यक्तीचीच नाही तर पदाची आणि पक्षाचीही प्रतिष्ठा कलंकित करतात.पूर्वी अशा काही घटना वारंवार घडत नसत मात्र आता या घटनांची वारंवारिता वाढली आहे.नुकत्याच राज्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक संपन्न झाली आहे.या निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या विजयाचे दावे-प्रतिदावे सादर केले आहे.व आमचाच पक्ष कसा लायक आहे ते जनतेच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न झालेला आहे.अद्याप आरक्षणानंतर सरपंच निवड जाहीर होण्यास उशीर आहे.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.
कोपरगाव तालुक्यातील ज्या-ज्या ग्रामपंचायतीनी विकासाची कास धरली त्या-त्या ग्रामपंचायती राजकीय नेत्यांच्या शिकार झालेल्या आपल्याला पाहायला मिळेल.त्यामुळे या ठिकाणी माजी मंत्री कोल्हे व माजी आ.कोल्हे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती.आपले सर्व सेनानी,रणभेदी तोफा,सरदार,दरकदार,वतनदार या कामी जुंपले होते हे उघड झाले आहे.त्यातून राजकीय आसमंतातील सुज्ञांनी पुढील दिशानिर्देशासाठी योग्य धडा घेणे गरजेचे आहे.
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीत आम्हीच शेमिगोंडे मिळवल्याचे अनेकांनी हाकारे दिले आहे.एवढ्यावरच गोष्ट थांबली नाही तर काही युवा नेत्यांनी थेट माजी मुख्यमंत्र्यांच्या वळचणीला जाऊन पाठीवर शाबासकी मिळविल्याचे पुण्य पदरी पाडून घेतले आहे.वास्तविक कुठल्याही राजकारणात वा निवडणुकीत यश मिळविण्याचे निश्चित असे व्याकरण नाही.तसे असते तर प्रत्येकाने तसे करून करून यश आपल्या पदरात पाडून घेतले असते.तरीही काहींनी निवडणुकीनंतर मात्र तसे करून आपले हसे करून घेतले आहे हे खरे आहे.वास्तविक असे करण्याला कोणाला काही धरबंध करता येणार नाही हे हि तितकेच खरे आहे.हा ज्याचा-त्याचा समाधान मिळविण्याचा सोपा मार्ग आहे.त्यात विरजण घालण्याचा कोणालाही अधिकार नाही.मात्र कुठल्याही निवडणुकीचे विश्लेषण होणे गरजेचे आहे हेही तितकेच खरे आहे.त्या दिशेने हे थोडेशे पाऊल म्हटले पाहिजे इतकेच.
कोपरगाव तालुक्यात गत विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्याला निवडून दिले त्या पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने नाकारले असे गत दोन-तीन निवडणुकात व पंधरा वीस वर्षाच्या काळात घडले आहे.त्यामुळे या यशाला फार मोठे दिव्य करून “तो” मिळवला असे म्हणणे जरा अतिशोक्तीच म्हणावी लागेल.गत वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे निवडून आले.व त्या नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्याच निवडणूका होत्या.त्यामुळे या निवडणुकाकडे नागरिक व राजकीय निरीक्षकांच्या नजरा असल्या तर वावगे ठरवता येणार नाही.त्यामुळे कोणी पाठ थोपटून घेत असेल तर त्यांनी गत विधानसभा निवडणुकीत अपयश का आले याचेही उत्तर दिले पाहिजे व आतापर्यंत जिल्हा परिषद,पंचायत समिती,कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत अपयश का आले याचेही समर्पक उत्तर दिले पाहिजे.आता कारखाना वगळता एकही नाव घेण्यासारखी संस्था नाही.याला तुम्ही कोणाला दोषी ठरवणार आहे ? याचेही उत्तर शोधले पाहिजे.असो ! अपयशाला कोणीही वाली नसतो हेच खरे आहे.तरीही या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेमके काय झाले याचा उहापोह करणे उचित ठरणार आहे.याला कारण जसे पाची पक्वान्नाचे वारंवार जेवण करताना जशी चटणीचे महत्व अधोरेखित होते.तद्वतच स्थानिक प्रश्न ज्या-त्या गावाचे वेगळे-वेगळे असतातच पण गत सत्ततेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा पुर्ती झाली नाही की त्याला जसे पायउतार होणे गरजेचे असते.कारण एक विरोधी पक्ष हाच काय तो त्यांच्यासाठी पर्याय (उतारा) असतो.अशा राजकारणाची नैतिकता रसातळाला गेलेल्या पक्षातून कमीत कमी वाईट निवडणे एवढाच प्राप्त परिस्थितीत मतदारांना पर्याय आहे.कोल्हे काय आणि काळे काय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.एव्हाना जनतेला हे केंव्हाच कळून चुकले आहे.यात नाविन्य काही राहिलेले नाही व हे वास्तव कोपरगावातील राजकीय दृढाचार्यांनी कधीच लेखी स्वरूपात कबुल करूनही आज मतदारांपुढे अन्य पर्यायच ठेवला नाही हे प्रस्थापित रसातळाला गेलेल्या राजकीय यंत्रणेचे (चांगले म्हणा अथवा वाईट म्हणा) यश आहे.त्याला वर्तमानात तरी आज पर्याय नाही तो निर्माण होईल तेंव्हा होईल मात्र आज वास्तव कबुल केले पाहिजे.आज तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींपैकी काळे-कोल्हे वगळून किती ग्रामपंचायती स्वयंप्रेरणेने काम शकतात हा खरा हा कळीचा मुद्दा आहे.फक्त मागील पानावरुन पुढील पानावर जे काही सुरु आहे तेच पुढे रि ओढण्याचे काम सुरु आहे.स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांची निर्णयक्षमता हा स्वतंत्र लिहिण्याचा विषय होईल यात त्याचा समावेश करणे आतताईपणाचे होईल.पण या पातळीवर कोपरगाव सपशेल नापास आहे हे वास्तव पचवायला अवघड जाईल पण हे वास्तव खरे आहे.याला अपवाद फक्त संवत्सर,पोहेगाव,सांगवी भुसार,(अंचलगाव हा स्व.र.फ.शिंदे यांच्या हयाती पर्यंत) व काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेली बहादरपूर ग्रामपंचायत ग्रामपंचायत मानली पाहिजे.या ग्रामपंचायतीकडे एक दृष्टिक्षेप टाकला तरी एक बाब स्पष्टपणे जाणवते ती हि की खालच्या पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झाला तर नक्कीच निर्णायक कामे होऊ शकतात.विकासाचे बेट त्या-त्या गावात उभे राहू शकते हे खरे असल्याचे आपल्याला लगेच जाणवेल.त्या पातळीवर संवत्सर ग्रामपंचायत नक्कीच उजवी ठरते हे वेगळे सांगणे न लगे.मात्र ज्या-ज्या ठिकाणी असे नेतृत्व उभे राहिले आहे किंवा उभे राहू पाहते त्या-त्या ठिकाणी त्या नेतृत्वाला अडचणीत आणण्याचे काम प्रत्येक निवडणुकीत झाल्याचे आपल्या निदर्शनास आल्या शिवाय राहाणार नाही.या ग्रामपंचायत निवडणूकीतही त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे.संवत्सर ग्रामपंचायतीत कोणती एक योजना राबविण्याची राहिली असा सवाल केला तर तो वावगा ठरू नये.अर्थात त्या साठी राजेश परजणे यांच्या मागे त्यांचे मेहुणे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपली ताकद उभी केली आहे हेही सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे.(तो भाग वगळला तर हाही विकास किती झाला असता हाही एक गहण प्रश्न आहे) असो.आपण या मुद्याकडे लक्ष वेधू ईच्छितो की ज्या-ज्या ग्रामपंचायतीत विकासाची कास धरली ती-ती ग्रामपंचायत राजकीय नेत्यांची शिकार झालेली आपल्याला पाहायला मिळेल.त्यामुळे या ठिकाणी माजी मंत्री कोल्हे व माजी आ.कोल्हे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती.आपले सर्व सेनानी,रणभेदी तोफा,सरदार,दरकदार,वतनदार या कामी जुंपले होते.हे उघड झाले आहे.त्या ठिकाणी एक बाब लक्षात आणून दिली पाहिजे ती हि की.ज्या पदाधिकाऱ्यांनी सहकारी कारखानदारीचे उपाध्यक्षपद भूषवले त्यांनाही या रणांगणात उतरवून या नेत्यांनी नेमके काय साधले आहे हा प्रश्न कोणाही सुज्ञास निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.त्यातून या नेत्यांची लायकी एक अर्थाने त्यांनी दाखवून दिली असून तुम्हाला आमच्या कृपेखाली जगावे लागणार आहे.व तुमची हि लायकी असून त्या साठी आमच्या आदेशाचे पालन हि त्याची कसोटी आहे.त्यामुळे आमच्या आदेशाचे पालन जो करणार नाही त्याला त्याची योग्य जागा अशीच दाखवुन देऊ हा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला इशारा आहे.तर दुसरीकडे त्या नेत्यांच्या खेळीला राजेश परजणे यांनी जशास तसे उत्तर देऊन एवढी ताकद पणाला लावूनही तुमच्या हाती फार काही लागणार नाही हेच दाखवून दिले आहे.ज्या पातळीवर या ग्रामपंचायत निवडणूका लढल्या गेल्या त्या निडणुका १९७२ च्या निवडणुकीची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही.त्याही वेळी अशीच साड्या-लुगड्यांची खैरात झाली होती.तेथून पुढेच राज्याला मतांसाठी पैसे हि संकल्पना रूढ झाली होती हे इथे विसरता येणार नाही.हा पैशाचा घोळ चांगल्या नितिवान,चारित्र्यवान लोकांचाच बळी घेत असतो.किंबहुना त्यांचा बळी घेण्यासाठीच त्याची योजना या सत्तालोलुप नेत्यांनी केली असते असे म्हणणे सोयीस्कर ठरेल.वर्तमानात सत्ता आणि पैसा हे समीकरण सिद्धांत आणि मूल्ये आणि नैतिकतेपेक्षा सरस दिसून येत आहे.हा लोकशाहीसाठी खूप मोठा धोका आहे.यात लोकशाही साध्य नसून साधन आहे व लोककल्याण हे लोकशाहीचे साध्य आहे याचा कोपरगावातील साखर सम्राटांना विसर पडला आहे असे नव्हे तर तो त्यांनी आपल्या सोयीसाठी पाडून घेतला आहे असे म्हणणे जास्त सोयीस्कर होईल.असे असतानाही कोकमठाण या ठिकाणी हे सर्व उभे करूनही कोल्हे गटाला त्या ठिकाणी अपयश का आले याचे उत्तर प्रथमदर्शनी उल्लेख केल्या प्रमाणे थंडी वाजल्यावर माणूस स्वाभाविकपणे उन्हात उभा राहतो हे जसे उत्तर आहे तेच कोकमठाण ग्रामपंचायतीच्या अपयशाला लागू होते हे येथे विसरता येणार नाही.आपले काही उभे करण्यापेक्षा दुसऱ्याचे काही उध्वस्त करण्याच्या डावपेचांनी या तालुक्याचे वाटोळे झाले आहे.दुरवस्था झाली आहे.हे मतदार म्हणून जनता समजून घेत नाही तोवर या तालुक्याचे काही भले होणार नाही.वर्तमानात तालुक्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पक्ष म्हणजे कौटुंबिक जहागिऱ्या बनल्या आहेत.एक मध्यवर्ती नेता आणि त्याच्या सत्ताकांक्षा पूर्तीसाठी राजकीय पक्ष असे त्याचे स्वरूप त्यांच्या तीन-तीन पिढ्या निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या त्यामुळे पक्षातील जेष्ठांना संधी नाकारली जाते याचे कोणालाही सोयीरसुतक नाही.दारू,भरमसाठ पैसा,त्यातून आलेला उन्मादाने या तालुक्यातील तरुणाईला वेढून टाकले आहे.आपल्याच जुन्या सहकारी व सवंगड्याचा विश्वास आपल्यावर का राहिला नाही त्याची फिकीर नसेल तर या तालुक्याला भवितव्य काय शिल्लक उरू शकते ? हा या निमित्ताने निर्माण होणारा खरा प्रश्न आहे.