संपादकीय
पोलिस ठाण्याचे विभाजन असून अडचण, नसून खोळंबा !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि जवळके ही दोन गावे राज्याच्या गृह विभागाने ०५ ऑगस्टच्या निर्णयाने नागरिकांच्या सोयीने (की प्रशासनाच्या गैरसोयीने ) आता शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काढून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यास जोडली आहे.त्यामुळे हा निर्णय ग्रामस्थानी स्वागत करावे की डोक्याला हात लावून घ्यावा अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे.त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

“कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडिल सर्व १३ गावे प्रशासनाच्या व नागरिकांच्या सोयीसाठी एकाच तालुक्यात आणावी त्यात नागरिकांचे हित दडले आहे.सन -२००० सालानंतर गावांची विस्कटलेली घडी पूर्ववत करावी”-गंगाधर रहाणे,अध्यक्ष, कोपरगाव तालुका शिवसेना (उबाठा)
कोपरगाव तालुक्याचे विभाजन होऊन आता २५ वर्षे उलटली आहे.युती शासनाच्या काळात नगर जिल्ह्याचे प्राधान्याने विभाजन करण्याऐवजी राहाता हा नवीन तालुका राज्य शासनाने तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मागणीनुसार मंजूर केला होता.त्यानंतर आजही अकोले आणि कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना जवळपास १५० ते २०० कि.मी.ची पायपीट करत नगरला जावे लागते.परिणामी एवढी यातायात करून नगरला पोहचल्यावर नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर काम करण्याचा उत्साह राहिला तर नवल.मात्र आजच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा विचार पिंडाला कावळा शिवत नाही तसे उत्तरेतील नेत्यांना आजही शिवत नाही.ना मतदार त्यांना याबाबत जाबसाल करत आहे असो.इथे संदर्भ इतकाच की राहाता तालुक्यातील शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेली कोपरगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायत हद्दीतील १३ गावे आज तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत विभागलेली आहे.वास्तविक प्रशासकीयदृष्ट्या ती एकाच तालुक्यात हवी होती.त्यासाठी जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सन-२००० साली या जवळके,शहापूर,बहादराबाद,धोंडेवाडी,बहादरपूर,अंजनापूर,वेस- सोयगाव,काकडी,मल्हारवाडी,डांगेवाडी, मनेगाव,रांजणगाव देशमुख आदी १३ गावच्या १० ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांचे ठराव घेऊन ही सर्व गावे भौगोलिक संलग्नतेसाठी राहाता तालुक्याला जोडावी अशी महत्वपूर्ण मागणी केली होती.तर दुसरीकडे वाकडी आणि परिसरातील गावांनी त्यांना भौगोलिक संलग्नतेसाठी व नजीक असल्याने श्रीरामपूर तालुक्याला जोडावी अशी महत्वपूर्ण मागणी केली होती.त्यांनी त्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची राणा भीमदेवी गर्जना केली होती. मात्र त्यावेळी दुर्दैवाने राहात तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिमेकडे असलेल्या गावांची गणना ही तत्कालीन माजी मंत्री कोल्हे समर्थक म्हणून ही गावे ओळखली जात होती. आणि नेमका गोदावरी दूध संघाचा कोल्हे- परजणे संघर्ष त्यावेळी टोकाला पोहचलेला होता.परिणामस्वरूप मंत्री विखेंनी यासर्व गावांच्या मागणीला केराची टोपली दाखवली होती.त्याची किंमत आजही ही गावे मोजत आहेत.गेल्या २५ वर्षात कोणीही नेता या गावांच्या प्रश्नाला वाचा फोडू शकलेला नाही.

दरम्यान कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी ही गावे आपण समाविष्ट केल्याची जाहिरात सुरू केली असून त्यांच्या कार्यालयाने शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हि सर्व गावे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्याची मागणी केली असल्याचे सांगून केवळ दोनच गावे का समाविष्ट झाली ? असा प्रश्नार्थक सवाल विचारला असून बाकी गावे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी संकुलावर अनेक वेळा चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यावेळी नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त संताप बाहेर पडून त्यांनी ‘ रास्ता रोको’
तत्सम आंदोलने केली जात होती.त्यावेळी त्यांनी शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारेसह नैऋतेकडील १६- १७ गावे कोपरगाव तालुक्यातील पोलिस ठाण्यास जोडावी अशी मागणी वारंवार केली होती.त्याला आता ७-८ वर्षाचा कालावधी उलटुन गेला आहे.त्याला कारण देणाऱ्या या गावांनी शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जगप्रसिद्ध श्री साईबाबा देवस्थान असल्याने या ठिकाणी देशभरातील अती महत्वाच्या व्यक्तींचा मोठा राबता असतो. परिणामो येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांची सरबराई करण्यात नको इतका वेळ जातो.परिणामी गुन्हे दाखल करून त्यांचा तपास करणे ही बाब त्यांच्यासाठी मोठी जिकिरीची ठरते.परिणामी आरोपींचा शोध घेणे आणि गुन्हासिद्धीचे प्रमाण अत्यल्प ठरते त्यामुळे आरोपींवर वचक रहात नाही.आणि गंभीर गुन्ह्याचा आलेख सातत्याने उंचावत राहतो. त्यामुळे या गावांचे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात वर्गीकरण आवश्यक आहेच. पण ही तीन पोलिस ठाण्यात विभागलेली गावे एकाच छत्राखाली कोपरगाव तालुक्यातील पोलिस ठाण्यात आणणे गरजेचे असताना घडले मात्र उलटेच.सर्व गावांऐवजी केवळ पोहेगावं खुर्द आणि बुद्रुक (दोन्ही मिळून एकच ग्रामपंचायत) आणि जवळके खऱ्या अर्थाने ही दोनच गावे कोणतीही भौगोलिक संलग्नता नसताना नेमकी उचलून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात वर्ग केली आहे.त्यामुळे खरे तर जवळके या गावापासून शिर्डी पोलिस ठाणे केवळ १०-११ कि.मी.अंतरावर आहे आणि कोपरगाव तालुका पोलिस ठाणे जवळपास २०-२२ किमी अंतरावर आहे.त्यातच तळेगाव दिघे मार्गे कोपरगाव -संगमनेर मार्ग गेल्या दोन दशकात नगर-मनमाड सारखा पुरता बदनाम झालेला आहे.त्यामुळे या दोन्ही गावात एखादी दुर्घटना घडली आणि तत्काळ पोलिस मदतीची गरज लागली तर ते किमान दिड ते दोन तास पोहचू शकणार नाही.परिणामस्वरूप हिंदी सिनेमातील पोलिसांसारखी घटना घडून गेल्यावरच पोलिस काठी आपटत जाणार हे सूर्यप्रकाशा इतके इतके स्वच्छ आहे.त्यामुळे केवळ ही दोन गावे जोडून या भागातील ग्रामस्थाना हे कोपरगाव पोलिस ठाणे असून अडचण नसून खोळंबा न ठरले तर नवल !

कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव ग्रामपंचायत एकच असताना वेस गाव शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर सोयगाव राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे मोठे आक्रित आहे.तर काकडी,मनेगाव आणि अर्धे सोयगाव आदी तीन गावे राहाता पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाकून पोलिस प्रशासनाने आपल्या गलथान पणाचा नमुना दाखवून दिला आहे तर राजकीय नेते त्याकडे डोळेझाक करत आहे हे विशेष !
आधीच गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे समाधानकारक चित्र दिसत असताना गुन्हे कोर्टात सिध्द होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने खालावत आहे.अधिकाधिक गुन्हे कोर्टात सिध्द व्हावेत,यासाठी तपासाचा दर्जा सुधारण्यावर वरिष्ठ पोलिस अधिकारी भर देत आहेत.त्यासाठी गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही वर्षापूर्वी ३ आठवड्यांचे खास प्रशिक्षण दिले असून,अधिकाधिक पोलिसांना ते देण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता.
याच दरम्यान पोलिसांचे कोर्टात गुन्हे सिध्द करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.शिक्षेअभावी आरोपींना पुन्हा रान मोकळे मिळते.गुन्हा घडूनही केवळ तपासातील त्रुटींमुळे सिध्द होत नसेल,तर तो दाखल तरी का करावा,अशी नकारात्मक भावना समाजात वाढीला लागत आहे.गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करू लागले असताना पोलिस मात्र जुन्याच पध्दतीने तपास करत असल्याने त्यांचे हात गुन्हेगारांपासून दूर राहतात.त्यामुळे गेल्या काही वर्षांत ठाणे पोलिसांचे गुन्हे सिध्द करण्याचे प्रमाण दोन आकड्यांमध्ये पोहोचू शकलेले नाही.भाजप राजवटीत देशभर दळणवळणाची व्यवस्था गतिमान होत असताना कोपरगाव तालुक्यात नेमके उलटे चित्र आहे.या सर्व गावांसाठी दंडाधिकारी तहसील कार्यालय,तालुका व जिल्हा न्यायालय कोपरगाव येथे आहे तर पोलिस ठाणे केवळ शिर्डीत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.अशावेळी शिर्डी पोलिस ठाण्याकडून काढलेल्या गावांना हा निर्णय असून ‘ अडचण नसून खोळंबा’ न ठरला तर नवल !

“आपल्या माहितीप्रमाणे ०७- ०८ वर्षापूर्वी या गावांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात समावेश करावा अशी मागणी केली होती.त्यानुसार हा निर्णय राज्य शासनाच्या गृहविभागाने घेतला असल्याचे दिसते”-शिरीष वमने,शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या माहितीप्रमाणे ०७- ०८ वर्षापूर्वी या गावांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात समावेश करावा अशी मागणी केली होती.त्यानुसार हा निर्णय राज्य शासनाच्या गृहविभागाने घेतला असल्याचे दिसते अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी ही गावे आपण समाविष्ट केल्याची जाहिरात सुरू केली असून त्यांच्या कार्यालयाने शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हि सर्व गावे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्याची मागणी केली असल्याचे सांगून केवळ दोनच गावे का समाविष्ट झाली ? असा प्रश्नार्थक सवाल विचारला असून बाकी गावे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव ग्रामपंचायत एकच असताना वेस गाव शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर सोयगाव राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे मोठे आक्रित आहे.तर काकडी,मनेगाव आणि अर्धे सोयगाव आदी तीन गावे राहाता पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाकून पोलिस प्रशासनाने आपल्या गलथान पणाचा नमुना दाखवून दिला आहे तर राजकीय नेते त्याकडे डोळेझाक करत आहे हे विशेष ! ही कोपरगाव तालुक्यातील सर्व गावे प्रशासनाच्या एकाच छत्रछायेखाली आणणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया संपर्क -7066 227 227.