संपादकीय
कोल्हे काळेंचा हिशेब चुकता करणार… ?
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्यासाठी पवार गटाच्या दोन्ही बाजूंनी जोर लावला जात असून ग्रामीण व शहरी भागात सभा व फेऱ्याना ऊत आला आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या विरुध्द शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार संदीप वर्पे यांची लढत होत आहे.त्यात तिसरा कोन निर्माण झाला असून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आपल्या परीने चांगलीच ताकद लावली आहे.मात्र या लढतीत खरा आणि निर्णायक पेच हा माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचा गट खरेच आशुतोष काळे यांच्या महायुतीचे काम करणार का ? या प्रश्नांना भोवती सर्व राजकारण फेर घेताना दिसत आहे.असे झाले तर त्यांनी सन-१९९९ च्या माजी मंत्री शंकरराव कोल्हे विरुध्द नामदेवराव परजणे लढतीत माजी खा.शंकरराव काळे यांनी माजी आ.अशोक काळे उभे असताना सुद्धा दुपारी मतदार संघाचा आढावा घेऊन आपली निर्णायक मते कोल्हेंच्या पारड्यात टाकून त्यांना विजयी केले होते त्यातून त्यातून कोल्हे आता उत्तराई होणार का ? नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षक मतदार संघातील उट्टे काढणार ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
लोकशाहीत ‘राजकारण’ हे खरे तर समाजकारणाचे एक मोठे साधन.‘समाजकारण करता यावे,समाजसेवा करता यावी म्हणून सत्तेचा सोपान चढतो आहोत’, असे म्हणणारे नेतेही आपल्याकडे विपुल आहेत.ही भूमिका फक्त सत्ता प्राप्तीपर्यंतच मर्यादित असते,हे त्यांच्या पक्के ध्यानी असते; आता फक्त जनतेने हे लवकर ध्यानी घेणे आवश्यक आहे. समाजसेवेचे नाव घेत सत्तेचे पद एकदा हस्तगत केले की मग त्यांना लोकांच्या भल्याचा यांना विसर पडतो आणि ‘घरभरणी’ सुरू होते.एकदा सुरू झालेली ही घरभरणी मग पाच-सात पंचवार्षिक आणि त्याहीनंतर-पुढच्या पिढ्यांपर्यंत-थांबायचे नावच घेत नाही.‘लोकशाही राजा-राणीच्या उदरातून नव्हे; तर मतपेटीतून जन्माला येईल’ असे म्हटले जाते ते उगीच नाही.पण आमच्या सरंजामी मानसिकतेने हे फोल ठरवले असल्याचे दिसून येत आहे.
देशात आणि राज्यात पिढ्यानपिढ्या घराणेशाही मजबुतपणे सुरू आहे.या घराणेशाहीला आता एकही पक्ष अपवाद राहिलेला नाही.स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्वकर्तृत्वाने,खऱ्या अर्थाने जनसेवा करत उदयाला आलेले नेतृत्व स्वाभाविकपणेच संयमी होते.तळागाळातून त्यांची जडणघडण झालेली असल्याने त्यांना समाजाचे प्रश्न समजत होते,उमगत होते.समाजाशी,पक्षीय विचारांशी त्यांची बांधिलकी होती.कितीही प्रलोभने समोर उभी ठाकली तरीही मुरारबाजीसारखी ही पिढी पक्षनिष्ठ,स्वामिनिष्ठ असायची.किमान काही मूल्यांना धरून राजकारण केले जायचे.वैचारिक मतभेद वैचारिक पातळीवरच वादविवादाने लढले जायचे.प्रचारादरम्यान आणि त्याचप्रमाणे पुढे विधानसभेत,लोकसभेत अभ्यासपूर्ण मांडणी केली जायची.उत्तम अभ्यास,उत्तम विश्लेषण आणि कमालीचे वक्तृत्व यांनी या काळातील नेतृत्व संपन्न असल्याचे दिसते.माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांच्या सारखे तत्त्वनिष्ठ,पक्षनिष्ठ नेते होते;कारण लोकही तसेच होते.आपल्या विचारधारेच्या पक्षाच्या प्रचारासाठी घरची शिदोरी घेऊन कधी पायी,कधी सायकलने,तर कधी ट्रकमध्ये बसून प्रचार करणारे लोक होते.
पुढे मात्र काळ बदलत गेला! समाजसेवेची,लोकसेवेची संकल्पना आणि धारणाच बदलत गेली.प्रत्यक्ष कामापेक्षा दिखाऊ वृत्ती वाढीस लागली.‘खादीचे पांढरे कपडे’ हा समाजसेवेचा ड्रेसकोड झाला.दिवसेंदिवस लोकांचा आपमतलबीपणा वाढल्याने धनदांडग्या शक्तींना अधिक वाव मिळत गेला.लोकांचीही लोकशाही विषयीची जाण फारशी विकसित होऊ शकली नाही.संविधानोत्तर कालखंडात संविधाननिष्ठ समाज-संस्कृती निर्माण व्हायला हवी होती; मात्र तसे न होता लोकांची मानसिकता मध्ययुगीन काळातच रेंगाळत राहिली.आपल्याला घर आहे की नाही,यापेक्षा आपल्या राजाचा वाडा किती मोठा,किती सुंदर याच मानसिकतेत लोक आजही वावरताना दिसतात.त्यामुळे त्यांना आपणच निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आपला ‘राजा’च वाटतो.याच मनोभूमिकेतून मग ‘राजा माझ्या मुलाच्या लग्नाला हजर राहिला’ आणि ‘वडीलांच्या दहाव्या – तेराव्याला आला’ याचेच त्याला अप्रूप वाटताना दिसते.अशा माणसाला मग तो मत देऊन मोकळे होतो.राज्यकारभार करण्यासाठी आपण ज्याला आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत, लोकसभेत पाठवणार आहोत तो खरे तर आपला ‘सेवक’ असतो.आपल्या वतीने तो राज्याचा,देशाचा कारभार बघणार असतो.पण एकदा सत्तास्थानी गेल्यानंतर लोकांना आणि त्या सेवकालाही या बाबीचा विसर पडतो.याचे कारण म्हणजे हा प्रतिनिधी निवडतानाच आपण चुकीचे निकष लावलेले असतात.आपल्या जातीचा आहे,गावातला आहे, वैयक्तिक कामे करणारा आहे,मतांसाठी पैसे देणारा आहे आदी आदी.अशा निकषांमुळेच डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि मग उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसेनाशी होते. त्याने केलेला भ्रष्ट-आचार,बदललेला पक्ष,बदललेली मूल्ये आणि धोरणे; काही काही दिसेनासे होते.त्यामुळे तीच ती माणसे वारंवार निवडून येताना दिसतात.लोकांची अशी ही मानसिकता ओळखल्यानंतर नेतेही तशा प्रकारचीच तयारी करतात.पूर्वीच्या मराठी सिनेमात पाटलाबरोबर जसे काही गावगन्ना दाखवले जायचे,तसे आज कार्यकर्ते पाळले जातात.त्यासाठी कार्यकर्त्यांच्या मंडळांना सणावारांच्या उत्सवाच्या नावाखाली वेळोवेळी निधी पुरवला जातो.मंडप टाकत रस्ते अडवले जातात.लोकांना जे आवडते त्याचाच पुरवठा करताना लोकानुनयाचे धोरण अंगीकारले जाते.अनेक सवंग कार्यक्रम आयोजित केले जातात.त्याचप्रमाणे खुले आमिष दाखवणाऱ्या अनेक माफी योजना अमलात आणल्या जातात.’सत्तेसाठी वाटेल ते…’ हा आज परवलीचा मंत्र झालेला दिसतो.याच मंत्राच्या आग्रहामुळे मग विरोधकांना येनकेनप्रकाराने नेस्तनाबूत कसे करता येईल,त्याचेही नियोजन केले जाते.विचारवंतांना धमकावले जाते.मीडिया मॅनेजमेंट केले जाते.प्रचार सभेत सामान्य नागरिकांना कधीच बोलू दिले जात नाही.एखाद्या सामान्य नागरिकाने एखाद्या विद्यमान आमदाराच्या कारकीर्दीतील कार्याची अपूर्ती निदर्शनास आणून दिली तर लगेच त्याच्यावर विरोधकाचा शिक्का मारत त्या आमदाराचे कार्यकर्ते त्याला धक्काबुक्की करायला मागेपुढे बघत नाहीत.खरच ही लोकशाही आहे ? विरोधकांबद्दल बोलताना आता सगळ्यांनीच ताळतंत्र सोडले आहे.प्रचार सभेत विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा एकमेकांवर कमरेखालील भाषेत वार करण्यातच नेत्यांना धन्यता वाटू लागली आहे.काही पक्षांनी तर या कामी काही लोकांची खास नियुक्तीच केल्याचे दिसून येते.राहता,आणि संगमनेर,गंगापूर तालुक्यात याची अनुभूती आली आहे.कोपरगाव तालुक्यात अद्याप परिस्थिती बरी आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
कोपरगाव राजकीय आसमंतात सध्या दोन गट प्रबळ मानले जातात.त्यांची रेवड्याची कुस्ती शिर्डी आणि संगमनेर सारखी राज्यभर प्रसिद्ध आहे.मात्र यावेळी एक गटास भाजपने आपल्या सोयीने किनाऱ्याला लावले आहे.त्यामुळे सन-१९७२ नंतर पहिल्यांदा कोल्हे सोडून…अशी कुस्ती प्रथमच होत आहे.त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार…! की,फुसका बार ठरणार…! याकडे मतदारांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.खरे तर ही लढत शरद पवार विरुध्द अजित पवार अशी वरवर दिसत असली तरी ती तशी अंतर्गत असल्याचे दिसत नाही.त्यामुळे आशुतोष काळे यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार हे उघड आहे.शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवार यांची सभा संपन्न झाली त्यात संदीप वर्पे यांनी चांगलाच जोर लावलेला आढळून आला आहे.निदान सभास्थानी नियोजन तरी काळे गटापेक्षा सरस तर गर्दी कमी असल्याचे दिसून आले आहे.गर्दी नवखे असूनही कमी असली तरी संदीप वर्पे यांच्या मानाने चांगलीच मानली जात आहे.कारण मातब्बर विरुध्द नवखा अशी लढत होत असल्याने त्याबाबत काळे गट आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.आता मतपेटीत कोण सरस भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.आता अजित पवार यांच्या सभेत तालुक्यातील राजकीय प्रक्रियेत महत्वाची भूमिका असलेले राजेश परजणे,भाजप निष्ठावान माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके,राजेंद्र जाधव,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे आदी सर्व शिलेदार झाडून हजर होते.मात्र ज्यांना घरी जावून दस्तुर खुद्द महामहीम उपमुख्यमंत्री अजित पवार,आ.आशुतोष काळे यांनी निमंत्रण देऊनही माजी आ.स्नेहलता कोल्हे,बिपिन कोल्हे आणि युवराज विवेक कोल्हे मात्र अनुपस्थित राहिले असल्याचे प्रकर्षाने जाणवलेच नाही तर ती चर्चा मतदार संघ आणि मतदारांच्या केंद्रस्थानी राहिली आहे यात शंका नाही.त्यामुळे खरंच कोल्हे हे आपला महायुतीचा राजधर्म पाळणार का ?असा सवाल निर्माण झाला आहे.
आता या मागील राजकारण समजून घेतले तर यातील बारकावे मतदारांच्या नक्कीच लक्षात येतील.तसे वरवर पाहिले तर यापूर्वीही अशी कोल्हे-काळे यांची सत्व परीक्षा पाहण्याचे प्रसंग या दोन्ही राजकीय नेत्यांवर आले आहे.त्यात आठवण द्यायची झाली तर सेना-भाजप युतीच्या मंत्र्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यावर राज्यात सन-१९९९ साली विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या होत्या.त्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे विरुध्द माजी खा.शंकरराव काळे याचे सुपुत्र अशोक काळे यांची लढत झाली होती.मात्र त्या निवडणुकीत या निवडणुकीसारखा तिसरा कोण तयार झाला होता तो होता गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष नामदेवराव परजणे यांच्या तिसऱ्या गटाचा.त्यावेळी त्यांना पाठिंबा दिला होता तो शिवसेना आणि भाजपने.आणि काळे-कोल्हे यांचे अनेक समर्थक आदींनी पडद्याआडून शब्द दिल्याने त्यांनी या रणात उडी घेतली होती.वास्तविक ही संधी नितीन औताडे या तरुण तूर्कास होती.मात्र त्यांनी व्यावहारिक गणित पाहिल्याने नकार दिला होता त्यामुळे नाईलाजाने नामदेवराव परजणे यांना लढण्याची वेळ आली होती.आणि ती लढत अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाली होती.दरम्यान मतदार संघात असेच वातावरण निर्माण झाले होते की,नामदेवराव परजणे निवडून येणार.त्यामुळे स्वाभाविकच काळे-कोल्हे यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.मतदानाच्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास दोन्ही काळे आणि कोल्हे यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला असता सर्वत्र परजणे यांचे घोडे पुढे असल्याचे निरीक्षण त्यांच्या लक्षात आले होते.परिणामी ते सावध झाले होते.त्यांनी तातडीने पावले उचलली होती आणि विचार करून एकाने थांबण्याचा निर्णय घेतला होता.तो अर्थातच शंकरराव काळे यांनी.(नाही तरी कोपरगाव लोकसभेचा १९९१ चा अपवाद वगळता) त्यांना तो पर्यंत तालुक्याचे विधानसभेसाठी मतदारांनी कधीच स्विकारले नव्हते.त्यांनी दोन्ही वेळा निवडून येण्याचा विक्रम पारनेर मधून केला होता) आणि त्यांनी शरद पवार याचे सन-१९७८ चे बंडात त्यांना साथ दिली होती.त्याची बक्षिसी त्यांना राज्याचे शिक्षण राज्यमंत्रीपद मिळाले होते.परिणाम असा झाला की,काळे यांनी आपले कारखाना कामगार आणि निष्ठावान कार्यकर्ते यांचे मतदान थांबवले होते व सर्व मतदार संघाचा आढावा घेऊन निर्णयाअंती शंकरराव कोल्हे यांना आपली मते टाकून देऊन माजी मंत्री कोल्हे यांना विजयी केले होते.त्यावेळी हे दोन्ही नेते एक असल्याचे जनतेच्या निदर्शनास आले होते.त्यानंतर माजी खा.यशवंतराव गडाख आणि स्वतः शंकरराव कोल्हे यांच्या दोघांच्या चरित्रात आतून काळे-कोल्हे ही दोन्ही राजकीय घराणी एकच असल्याचा संदेश त्यांनी सर्वदूर दिला होता.आजही अनेक जण त्याला दुजोरा देत असतात.याची आठवण देण्याची गरज का भासली तर ही निवडणूक ही आता रणांगणातून कोल्हे हे बाहेर फेकले गेले आहेत.तर काळे यांना हे शिवधनुष्य एकट्याला पेलण्याची वेळ आली आहे.त्यामुळे वरवर ही सर्व साखर सम्राट मंडळी एकत्र आली की राजकीय गणितात दोन अधिक दोन कधीच होत नाही याची चिंता राजकीय नेत्यांना लागून राहते.विहिरीतील पाण्याचा उपसा केला नाही तर ते अन्य मार्ग शोधत असते अशीच गत कार्यकर्त्यांची असते.नेत्यांना बाटलीतील भूत बाहेर आल्यावर त्याला कायम काहीतरी काम द्यावे लागते तरच ते निर्माणकर्त्यास बाधित होत नाही ही इसापनीतीतील गोष्ट बोधप्रत आहे.आता कोल्हे गटाचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांची गोची ओळखून त्याचे रूपांतर डुक धरलेल्या वाघासारखी धोकादायक वागण्यात (किंवा हिंस्त्र होण्यात) करू शकतात याची जाणीव काळे गटास ठेवावी लागणार आहे.दरम्यान मतदार संघातील मतदार त्यांना ठोकरून पुढे अन्य प्रवाह शोधत असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आता लढत धोकादायक वळणावर आली असल्याचे मानले जात आहे.
राज्यात महायुतीला मुस्लिम मते होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.त्यांचा,’व्होट जिहाद’ कालच देवेंद्र फडणवीस यांनी जगजाहीर केला आहे.त्याचा फायदा महायुती आणि आशुतोष काळे यांना होणार का असा सवाल आता निर्माण झाला आहे.असे असले तरी या पूर्वी बरोबर असलेले दलीत मते दुरावली असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.या शिवाय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जुन्या पेन्शनच्या दुखण्याने महायुती पासुन दुरावले असल्याचे आमच्या पाहणीत आढळून आले आहे.त्यामुळे त्यांची सारी मदार आता कोल्हे गटावर आहे.त्यातच काळे आणि औताडे गट यांचे कोपरगाव (कर्मवीर सहकारी कारखान्यांवरच असलेले हाडवैर जगजाहीर आहे)परजणे गट आज सोबत आहे यात शंका नाही.त्यांची राजकीय मजबुरी आहे.पण त्यांचे वडिलांना (नामदेवराव परजणे यांना )सन-१९९९ साली याच जोडगुळीने हरवले याची जाणिवेने जर अचानक क्षणी उचल खाली तर पुढे धोका वाढून ठेवलेला आहे.(तसे दस्तुरखुद्द तत्कालीन खा.बाळासाहेब विखे या व्याह्याने त्यांना कवडीची मदत केली नव्हती त्यामुळे ते आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी दुःखीच होते हे वेगळे सांगणे गरजेचे नाही)त्यामुळे आता कोल्हे घराण्याने सन-१९९९ सालच्या लढतीची जाणीव ठेवली तर आ.आशुतोष काळे यांनी ही लढाई आजच मोठ्या फरकाने जिंकलेली आहे.मात्र त्यांनी विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणुक डोळ्यासमोर आणली आणि आ.काळे कुटुंबाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या इशाऱ्या वरून थेट कोपरगावच्या मतदान केंद्रावर काळे पतिपत्नी हे दोघेही उभे राहिले होते याची मोठी सल ईशान्य गडावरील युवराजास आहे.त्या विरोधात काम केलेल्या लीला मनचक्षुसमोर युवराज कोल्हे यांनी आणल्या तरी मात्र काळे गटाची पंचाईत होऊ शकते असे राजकीय निरिक्षांचे मत आहे.शिवाय आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती,नगरपरिषद निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत.आपल्या कार्यकर्त्यांना आज कामाला लावले आणि उद्या पुन्हा विरोध लढण्याची वेळ आली तर कोणत्या तोंडाने त्यांना पुन्हा,” बाह्या सावरा…”,दंडाच्या बेटकुळ्या दाखवा” असे म्हणायचे अशी कोल्हे गटाची पंचाईत होणार आहे.गावोगाव ग्रामविकासासाठी जर हाच निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतला असता तर तो काळे-कोल्हे यांना मान्य केला असता का ? असा गंभीर सवाल यामुळे निर्माण झाला आहे.यातून “इतरांनी खाल्यास शेण आणि आम्ही करतो ती श्रावणी” ही काळे-कोल्हे यांची मिजास खरेच या निवडणुकीत कार्यकर्त्यांसमोर टिकेल का ? त्यामुळे आपली ढाल,तलवार आणि सैन्य नसताना संदीप वर्पे हे आपला गड निर्विवाद सर करतील ही शक्यता नाकारता येणार नाही असे झाले तर त्यांच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला जाईल हे नक्की.नेत्याबद्दल आपुलकी वाटणे,आदर वाटणे आवश्यक आहे नेतृत्व हे आपल्यातील आहे आपल्यासाठी आहे असे वाटले पाहिजे तरच ते नेतृत्व श्रेष्ठ ठरते ‘ या पातळीवर पश्चिम महाराष्ट्र नापास झालेला आढळतो त्याला हा मतदार संघ अपवाद नाही.
दरम्यान या काळे-कोल्हे यांच्या युतीबाबत एका कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी असून त्याने म्हटले आहे की,”जर या काळे कोल्हे या नेत्यांना एकत्र यायचे असेल तर आमची काहीही हरकत नाही त्यांनी आधी गावोगाव लावलेले तंटे-बखेडे मिटवून मग थेट युती करावी.त्यांच्या आदेशाने आम्ही लढाया केल्या आहेत.केसेस अंगावर घेतल्या; कोर्ट कचेऱ्या केल्या आहेत.अंगावरील वळ अद्याप बुजेलेले नाहीत”,”नेते कधी एक होतील कधी दूर होतील याचा नेम नाही,”पण आम्हाला आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढायच्या आहेत”,’आमचे स्वतंत्र अस्तित्व ठेवले तरच हे शक्य होईल “त्यामुळे कोल्हे गटाने आ.काळे गटाची खोडणी मोडण्याचे काम केले तर काळे यांच्या क्रांतीची पिपाणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.आता बघू हे नेते काय भूमिका घेणार हे लवकरच समजणार आहे.
दरम्यान आणखी तर एका कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांची नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली प्रतिक्रिया आणखी खूप काही सांगून जात आहेत ती अशी की,”विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी जर ०३ हजार कोटींची कामे केली असतील तर आमच्या मदतीची त्यांना गरजच काय ? आणि लागत असेल तर त्यांनी आजच पराभव मान्य केल्यासारखे आहे.
दरम्यान या वर्तमान थंड लढतीत मतदार संघातील तरुणाचा एक फायदा जरूर होणार आहे तो म्हणजे दारूचा धुमाकूळ कमी होणार असून व्यसनी तरुणाई रोखली जाणार आहेच शहरात आणि तालुक्यात अर्थपुरवठा संथ होणार असल्याने बाजार पेठेत सामसूम राहणार असल्याचे शहरातील व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.विरोधी उमेदवार इतका सक्षम नसल्याने ती शंका अधिक गडद होत आहे.
मोबाईल – 9423 43 9946.