गुन्हे विषयक
गावठी कट्टा लावून व्यापाऱ्यास लुटले,गुन्हा नाही ?
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील पोहेगाव ते देर्डे-कोऱ्हाळे या मार्गावर समृध्दी महामार्गाच्या पुलाखाली भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास नुकतीच तीन दरोडेखोरांनी आपल्या दुचाकीवर येवून एका येवला शहरातील प्लॅस्टिकच्या व्यापाऱ्याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्याच्या कडील सुमारे १२-१५ हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव आणि येवला आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात डझनावारी गावठी कट्टे आणि त्यासोबत डझनावार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.या गुन्ह्यात विक्रीसाठी आलेले गावठी कट्ट्यांसह आरोपी पकडले गेले,तरीही गावठी कट्टे आणि ते वापरणारे आरोपी कमी होण्याची कोणतीही शक्यता दृष्टी पथात असल्याचे दिसत नाही उलट गावठी कट्टे कोपरगाव सह नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.त्यातून अनेक गुन्हे उघडकीस येत असून अनेक गुन्हे घडणार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.मात्र हे कट्टे येतात कुठून आणि त्यावर पोलिस प्रशासन करते तेरी काय ? असा सवाल सामान्य नागरिकांना न पडला तर नवल.अशीच गावठी कट्ट्याची आणि त्याच्या धाकातून लुटमारीची घटना उघड झाली असून यातील बाधित व्यापारी हा येवले या शहरातील असून तो प्लास्टिकचा व्यापार करतो.तो पोहेगाव येथील आपले काम आटोपून देर्डे-कोऱ्हाळे मार्गाने जात असताना दुपारी १२ वाजेच्यां सुमारास त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या तीन तरुणांनी त्यांचा पटलाग करून त्यांना सदर पुलाखाली गाठले व त्या व्यापाऱ्यास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्या कडील सुमारे १२-१५ हजारांची रक्कम घेऊन पोबारा केला आहे.त्यामुळे सदर व्यापारी आपला जीव वाचला (जान बचाई लाखो पाये…) या समाधानात तेथून काढता पाय घेतला आहे.मात्र त्याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेला दुजोरा दिला आहे.मात्र या बाबत कोणीही पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नाही त्यामुळे पुढील कार्यवाही करता आली नाही अशी सबब दिली आहे.