गुन्हे विषयक
शहर विद्रुपीकरण,कोपरगावात दोघांवर गुन्हा !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण झाले असून त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.या विद्रूपीकरणात सत्ताधारी आणि विरोधक मोठ्या प्रमाणावर सामील असल्याचे दिसून येत आहे.अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी नुकताच नगरपरिषदेने फ्लेक्स बनविणाऱ्या कंपनीवर नगररचना विभागाचे कर्मचारी किरण बाळासाहेब जोशी (वय -33) यांनी दोन फ्लेक्स संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे फ्लेक्स व्यावसायीकांत खळबळ उडाली आहे.
शहरांतून लाईट किंवा टेलिफोन वायरच्या खांबांवरून लावण्यात येणारे,रस्त्यानाजिकच्या जागेत फलक खरं तर अनेकदा शहराचे सौंदर्य बिघडवत असतात.या फलकांवर पुन्हा कोणत्या तरी राजकीय पक्षाचे झेंडेही लावण्यात येतात.असेच खांबांवरून जाहिरातबाजी करण्याचे पेव शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर फुटले आहे.कोणतीही परवानगी न घेता अशी फलकबाजी केली जाते.जाहिरातीचे फलक मोक्याच्या ठिकाणी व अधिकृत असण्यावर कुणाचा आक्षेप नसेल.परंतु मनमानीपणे लावण्यात येणारे फलक शहर किंवा गावाचे सौंदर्य बिघडवत असतील तर ते वेळीच तेथून हटविणे योग्य ठरेल.या प्रकरणी मागील पांच वार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या अवैध फ्लेक्स पद्धतीला चांगलाच चाप लावला होता.परवानगी असल्याखेरीज ती फ्लेक्सवर लावल्याखेरिज सदरचा फ्लेक्स अधिकृत धरला जात नव्हता.त्यातून पालिकेला उत्पन्नात वाढ नोंदवली होती.मात्र अडीच वर्षापूर्वी कोपरगाव नगरपरिषदेत प्रशासकराज आल्यापासून यावर कोणाचेही निर्बंध राहिलेले नाही.परिणामी मोठ्या प्रमाणावर शहरात विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येत आहे.नुकताच जलपूजनचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी हे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळाले आहे.यावर नेत्यांनी स्वतःहून निर्बंध आणले पाहिजे व त्याच्यावर नियंत्रण आणायला हवे.मात्र या विपरित घटना घडत असून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता कडक भूमिका घ्यायला हवी आहे.
दरम्यानच्या काळात एक समाधान कारक घटना घडली असून कोपरगाव नगरपालिकेच्या नगररचना विभागाचे कर्मचारी किरण जोशी यांनी एका फ्लेक्स बनविणाऱ्या आस्थापनाच्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे आगामी काळात तरी यावर प्रतिबंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 406/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125,223 व महाराष्ट्र मालमत्तेचा विरोपतास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.को.बी.एच.तमनर हे करीत आहेत.