गुन्हे विषयक
महिलेचा छळ,कोपरगावात चौघांवर गुन्हा
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री सासर असलेल्या व संवत्सर माहेर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी तिचा नवरा भाऊसाहेब दिनकर घोरपडे,दिर विलास दिनकर घोरपडे,सासू जानकाबाई दिनकर घोरपडे,व सूर्यकांत निर्मळ (पूर्ण नाव उपलब्ध नाही) आदींनी आपला शारिरीक व मानसिक छळ केला असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने राहाता,कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.फिर्यादी महिलेचे नाव प्रांजली भाऊसाहेब घोरपडे असे आहे.
सन-1986 मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम 498-अ या कलमाची तरतूद करण्यात आली.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.पत्नीला सासरी झालेल्या त्रासाबद्दल पती हा प्राथमिक स्वरुपात जबाबदार असतो.अशा प्रकरणात हा त्रास नातेवाईकांकडून जरी झालेला असला तरी पतीचीही त्यामध्ये जबाबदारी असते असं न्यायालयाने वेळोवेळी म्हटलं असताना या गुन्ह्यात काही कमी येताना दिसत नाही.अशीच घटना नुकतीच राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथे घडली आहे.
यात फिर्यादी महिलेने म्हटले आहे की,”आपण सासरी नांदत असताना आरोपी नवरा भाऊसाहेब घोरपडे,दिर विलास घोरपडे,सासू जनकाबाई घोरपडे,सूर्यकांत निर्मळ आदींनी आपल्या लग्नानंतर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर आपले खरे रूप दाखविण्यास सुरुवात केली होती.काही दिवसानंतर त्यांनी आपल्या माहेराहून घर बांधणीसाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी दि.05 जून 2018 पासून ते दि.20 मे 2024 पर्यंत वारंवार आपला शारिरीक व मानसिक छळ केला आहे.पैसे आणले नाही तर नांदवणार नाही अशी धमकी देऊन मारहाण करत शिवीगाळ केली आहे.असा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-375/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 498(अ),323,504,506 प्रमाणे चारही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.जे.पी.तमनर हे करीत आहेत.