गुन्हे विषयक
आरोपीकडे गावठी कट्टा आढळला,दोघांविरुद्ध गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनार्दन स्वामी ट्रस्टच्या मंगलक्ष कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साक्षीदार चंद्रकांत जोर्वेकर यांस कट मारून धमकावणारा आणि गावठी कट्टा बाळगणारा पोहेगाव येथील आरोपी मयूर नवनाथ औताडे (वय-२३) व त्याचा आणखी एक कौठे ता.सिन्नर येथील साथीदार शुभम सोनवणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या ताब्यातील हिरो स्प्लेण्डर दुचाकीचा (क्रमांक एम.एच.१७ डी.बी.५९५०) वापर करून अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पो.कॉ.महेश तावरे यांनी गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव आणि राहाता तालुक्यात वाळुसह अन्य अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असताना गतवर्षी शिर्डी पोलिसांना एका गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी गतवर्षी २३ मे रोजी सावळीविहीर शिवारात सापळा लावला असता त्यांना के.के.मिल्क डेअरी तरुण योगेश खरात हा गावठी कट्ट्यासह आढळला होता.त्यांनतर अशीच एक घटना नुकतीच १६ जून २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जनार्दन स्वामी मंदिराच्या मागील बाजूस मंगल कार्यालयाजवळ उघड झाली असून या बाबत कोपरगाव शहर पोलिसांनी पोहेगाव येथील मयूर नवनाथ औताडे व त्याचा साथीदार शुभम सोनवणे यांनी साक्षीदार चंद्रकात जोर्वेकर यांना कट मारून धमकावताना आढळून आला आहे.
दरम्यान दोन आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉ.महेश तावरे यांनी दोघांवर गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ भा.द.वि.कलम.५०४,सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे केल्या प्रकरणी दाखल केला आहे.त्यांच्या ताब्यातील ५० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेनडर व ०५ हजार रुपये किमतीचा स्टील लोखंडी बनावटीचा गावठी कट्टा त्यास मुठीस काळ्या रंगाची प्लॅस्टिकची पट्टी,त्यावर लाल रंगाची स्टारची डिझाईन तसेच गावठी कट्ट्यास खाली मॅगझिन जप्त केली आहे.मात्र दुसरा आरोपी शुभम सोनवणे हा मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाला आहे.त्याचा शहर पोलीस कसून शोध घेत आहे.
दरम्यान सदर घटना स्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करीत आहेत.