आरोग्य
….या महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराजनिक असलेल्या के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय,कोपरगाव येथे सर्व विद्यार्थी,प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आदींची आरोग्य तपासणी मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.

पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची अनेक कारणे आहेत,ज्यात दूषित पाणी,डासांची वाढ,अस्वच्छता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यांचा समावेश होतो.परिणामी कॉलरा,टायफॉइड,अतिसार आणि व्हायरल इन्फेक्शन यांसारखे आजार पसरू शकतात.त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे जरुरी बनते.त्यासाठी आपली नियमित तपासणी करणे गरजेचे ठरते ही गरज ओळखून कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने आज आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे.
याप्रसंगी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथील डॉ.पालवे,आरोग्य निरीक्षक एस.ए.जोशी हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे,प्रा.संदीप जगझाप,प्रा . दीपक बुधवंत,प्रा.मिलिंद कांबळे,प्रा.अभिजित वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगझाप यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना डॉ. पालवे यांनी आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले.तर आरोग्य निरीक्षक जोशी यांनी डेंग्यू,हिवताप,मलेरिया आणि तत्सम आजारांबाबत सखोल मार्गदर्शन केले.हे आजार पसरण्याचे कारणे,डासांचे वाढते प्रमाण,त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम हे ही त्यांनी सांगितले. हे आजार होऊ नये म्हणून काय उपाययोजना करावी, डासांचे वाढते प्रमाण कसे रोखावे,कोरडा दिवस कसा पाळावा याबाबत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
यावेळी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांची उंची,वजन, हिमोग्लोबिन पातळी व रक्तदाब यांची तपासणी करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन प्रा.जावेद शाह यांनी
केले तर उपस्थितांचे आभार प्रा.दिपक बुधवंत यांनी मानले शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रा. मयुरी भोसले,प्रा.सायली वायखिंडे,प्रा.अमोल वर्पे यांनी परिश्रम घेतले आहे.