आरोग्य
..या नागरिकांनी आपली तपासणी करून घ्या-तहसीलदार चंद्रे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशात व राज्यात कोरोना विषाणूंचा कहर सुरु असून नागरिकांनी अद्यापही बेफिकीर वागणे उचित ठरणार नाही त्या साठी बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी आपली व आपल्या कुटूंबांची काळजी घेण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःहून तपासणी करून आपल्या हातावर “होम कोरोंटाईन”चा शिक्का मारून घ्यावा व घरातच थांबावे, जे नागरिक सावधानता म्हणून घरात थांबणार नाही त्यांची नावे संबंधित पोलीस ठाण्यास कळवावे असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतेच केले आहे.
जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. रोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. तर शेकडो लोकांची मृत्यू होत आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही दिवसातील जगभरातील मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा व्हायरस अतिशय भयंकर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जगभरात ७ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मृतांची संख्या ऐकून धक्काच बसेल. मृतांनी तर ३१ हजारचा आकडा पार केला आहे.भारतात आतापर्यंत ११९० लोकांना कोरोनोची लागण झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आपल्या गावाकडे जात आहेत. पण हे नागरिकच कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. यामुळे सरकारने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काही दिवसात भारतातील गावं कोरोना विषाणूची केंद्र बनतील असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.या पार्श्वभूमीवर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिलेला इशारा गंभीर मानला जात आहे.
त्यांनी पुढे म्हटलेले हे की, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की पुणे-मुंबई आणि बाहेरून जे लोक गावाकडे आलेले आहेत त्या सर्व लोकांनी आपापल्या जवळच्या जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यायची आहे त्यानंतर “होम काॕरंटाईनचा” शिक्का मारून आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी थांबायचे आहे. कोपरगाव शहर व तालुक्यातील कुणीही व्यक्ती असे करण्यास नकार देत असेल तर तात्काळ संबंधित पोलिस ठाण्यास कळवावे. या पूर्वी तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथील लक्ष्मीकांत विघे त्यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची आठवणही त्यांनी शेवटी करून दिली आहे.