कोपरगाव तालुका
राहाता तालुक्यातील ‘त्या’ गावांचाही विकास करणार-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील ११ गावांमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जरी मताधिक्य कमी मिळाले असले तरी कोपरगाव तालुक्यातील गावांप्रमाणे विकासाच्या बाबतीत समान न्याय देणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
“कोपरगाव विधानसभा मतदार संघात आ.आशुतोष काळे करीत असलेले काम कौतुकास्पद आहे.कोणत्याही नवख्या आमदाराला आजपर्यंत असे काम करता आले नाही ते काम त्यांनी करून दाखविले आहे. त्यावेळी शिर्डीच्या मुस्लीम बांधवांनी अजानच्यावेळी आम्ही भोंगा बंद ठेवू मात्र साईबाबांची आरती भोंग्यावरून घेण्यात यावी अशी विनंती केली हि गौरवास्पद बाब आहे”-माजी आ.भाऊसाहेब चिकटगावकर,वैजापूर तालुका.
कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे सन २०२०-२१ अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत ४ कोटी ७० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या जेऊर कुंभारी-शिंगवे-पुणतांबा-श्रीरामपूर रस्ता (रामा ३) किमी १३/०० ते १९/२०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण झालेल्या कामाचे लोकार्पण व दारणा प्रकल्प अंतर्गत २५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या को.प. बंधारे देखभाल दुरुस्ती योजनेअंतर्गत पुणतांबा को.प.बंधारा रेलिंग दुरुस्ती व माथा कॉंक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन आ. काळे यांच्या शुभहस्ते व वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,माजी पं.स.सदस्य मधुकर टेके,पुणतांब्याचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे,अशोक धनवटे,सुधाकर जाधव,राहाता राष्ट्रवादी पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष सचिन धोर्डे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रताप धोंडे,वैजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे,डोणगावचे सरपंच रविंद्र धोंडे,पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता महेश गायकवाड,शाखा अभियंता रविराज पाटील,पुणतांबा-डोणगाव कृती समितीचे सदस्य,दोन्ही गावचे उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी सडे येथे ब्राह्मणगाव-टाकळी-कोपरगाव-सडे-शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) मध्ये कि.मी. १३/०० ते १९/०० मध्ये (सडे ते शिंगवे) सुधारणा करण्याच्या ३ कोटीच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”संपूर्ण मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व गावातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणे हि आपली नैतिक जबाबदारीच आहे.त्यामुळे ११ गावातून जरी मला मतातून प्रेम कमी मिळाले असले तरी विकासासाठी निधी देतांना माझे प्रेम कधीही कमी होणार नाही अशी कोपरखिळी त्यांनी मारली आहे.मागील पाच वर्षात या भागातील रस्ते विकासाचा निर्माण झालेला अनुशेष भरून काढण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.कोरोनाच्या संकटात देखील या ११ गावांच्या विकासासाठी निधी दिला त्यामुळे बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत.वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा ३.२५ कोटी,पुणतांबा-शिंगवे ४.७० कोटी,वाकडी मधील अंतर्गत रस्त्यासाठी २५ लाख,न.पा.वाडी ५० लाख,वाकडी कब्रस्थानसाठी १० लाख,तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत वाकडी खंडोबा देवस्थान ७० लाख,वाकडी येथील लांडेवाडी रस्ता २० लाख, वाकडी-गणेशनगर रस्त्यावरील सी.डी.वर्क (पूल) ८० लाख, रामपूरवाडी रस्त्यांसाठी २० लाख,जळगाव व एलमवाडी ७० लाख,पुणतांबा ईदगाह मैदान १० लाख,रस्तापूर येथील रस्त्यांसाठी २० लाख व पुणतांबा गावांतर्गत रस्त्यांसाठी २० लाख व चांगदेव महाराज देवस्थान व परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटी,पुणतांबा गोदावरी नदीवरी पूल दुरुस्तीसाठी २५ लाख,शिंगवे रस्त्यासाठी ५० लाख,चितळी २५ लाख असा जवळपास १४ कोटी रुपयांचा निधी या अकरा गावांच्या विकासकामांसाठी मिळविण्यात यश मिळाले आहे.या निधीतून अनेक कामे पूर्ण झाली असून काही काम प्रगतीपथावर तर काही कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.कोरोना संकट असतांना देखील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी आणला आहे.यावेळी पुणतांबा मुस्लीम पंच कमिटीच्या वतीने आ.काळे यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचलन वैजापूर राष्ट्रवादीचे युवकचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रविंद्र धोर्डे यांनी मानले आहे.