कोपरगाव तालुका
परिवहन महामंडळाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमहदनगर विभाग, अहमनगर व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण आयोजित ५६ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत कोल्हापूर विभागाने ४२ गुणांची कमाई करत प्रथम क्रमांकसह जनरल चॅम्पिअनशीपवर आपले नाव कोरले. तर पुणे विभागाने २८ गुण मिळवत द्वितीय व २६ गुणांसह सांगली विभागाने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच सर्व विभागांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे.
यावेळी व्यासपीठावर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन विश्वस्त माधवराव देशमुख, वसंतराव आव्हाड, प्रकाश भट, महामंडळाचे सतिश उज्जैनकर, शिवाजी कडू, प्रतापराव पवार, महादेव काळे, विजय गिते व पदाधिकारी प्राचार्य कांतीलाल पटेल, माणिक जाधव, सुधाकर मलिक, संदिप गायकवाड, रमेश कालेकर, क्रिडा विभाग प्रमुख अशोक कांगणे आदि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातील ३५ विभागातील ७६१ खेळाडूंनी सहभाग घेतला. सांघिक क्रीडा प्रकारातही कोल्हापूर विभागाने बाजी मारली. खेळाडूंना प्रमाणपत्र, पदक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच विशेष नैपुण्य पुरूष गटात हे पारितोषिकाचे मानकरी ठरले तर महिला गटात अर्चना शिंदे यांनी पारितोषिक मिळविले.
पारितोषिक वितरण सोहळयादरम्यान आत्मा मालिक इंग्लिश मिडीअम व आत्मा मालिक प्राथमिक गुरूकूलाच्या विद्याथ्र्यानी बहारदार नृत्यांविष्कार उपस्थितांची वाहवा मिळविली. पारितोषिक वितरणानंतर क्रीडा ज्योत मालवून व क्रीडा ध्वजाचे अवतरण करून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश कालेकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार अहमदनगर विभाग नियंत्रक विजय गिते यांनी मानले.