कोपरगाव तालुका
कोपरगावचे भूमीपुत्र अधिकाऱ्यांचा मुंबईत गौरव

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोव्हिड-१९ या कोरोना साथीच्या काळात पनवेलचे परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) शशिकांत तिरसे यांनी केलेल्या लक्षवेधी कामगिरीची दखल घेऊन त्यांचा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच राज भवन,मलबार हिल,मुंबई येथे “कोविड संजीवनी पुरस्कार” व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आला आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या आधी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्याकडून करोना काळातील कामे विशेषता ऑक्सीजन वाहतुकीत केलेल्या योग्य नियोजनामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवले असे म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत परराज्यातील मजुरांची रेल्वेद्वारे केलेल्या सोयीबद्दल जिल्हाधिकारी रायगड यांच्या वतीने प्रांताधिकारी,पनवेल यांनी मागील स्वातंत्र्यदिनी “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानित केले होते.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरटीओ विभागाकडून ऑक्सिजन वाहतुकीसाठी विशेषतः परराज्यातून भारतीय रेल्वे व वायुदलाच्या कार्गो विमानांद्वारे राज्यात प्राणवायू आणण्यासाठी शशिकांत तिरसे यांनी समन्वयक म्हणून काम केले.या काळात शासनाने ओरिसा,मध्यप्रदेश ,गुजरात तसेच विशाखापट्टणम येथून राज्यात ऑक्सिजन आणला त्यामुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचले.या शिवाय कोविड काळात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये खाटा,आय.सी.यू,व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठी कुटुंबाची पर्वा न करता मदत केली.लसीकरणात घेतलेला पुढाकार व जनजागृती या कामगिरीची दखल घेत त्यांचा राजभवनावर राज्यपालांनी कोविड संजीवनी पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.