कोपरगाव तालुका
दुग्ध व्यवसायातील खाजगीकरणावर शासनाने निर्बंध घालावेत-परजणे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकारात स्वाहाकार वाढल्याने आज अनेक संस्था डबघाईस आल्या आहेत.तर दुग्ध व्यवसायामध्ये सहकार आणि खाजगी भांडवलदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढल्याने सहकारी संस्था अडचणीत सापडल्या आहेत. सहकार टिकविण्यासाठी शासनाने खाजगीकरणावर काही निर्बंध घालावेत असा ठराव गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी संघाच्या वार्षिक सभेत मांडला.तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
भारतात सर्वप्रथम गोदावरी दृूध संघाच्या कार्यक्षेत्रात सॉर्टेडसिमेन ही कृत्रिमरेतन सेवा सुरु करण्यात आलेली आहे.त्याद्वारे ९३ टक्के कालवडींची पैदास झालेली आहे-राजेश परजणे,अध्यक्ष दूध संघ.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी माजी संचालक नानासाहेब सिनगर, ज्ञानदेव गुडघे,भागवतराव धनवटे,आंबादास वराडे,संघाचे उपाध्यक्ष संजय खांडेकर,संचालक उत्तमराव माने,विवेक परजणे,सुभाषराव होन,निवृत्ती नवले,सुनिल खालकर, भाऊसाहेब कदम,यशवंत गव्हाणे,सदाशिव कार्ले,गोपीनाथ केदार,दिलीप तिरमखे,कुंदाताई डांगे यांच्यासह दूध उत्पादक सभासद उपस्थित
होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सहकारी संस्थांमुळे महाराष्टातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला व प्रामुख्याने शेतकरी,दूध उत्पादक आणि कामगार वर्गाला चांगला आर्थिक हातभार लागलेला आहे.असे असताना मुक्त अर्थव्यवस्थेमुळे सहकारामध्ये खाजगी भांडवलदारांचा मुक्त संचार झाल्याने सहकारी संस्था अडचणीत सापडल्या आहेत.अशाही परिस्थितीत गोदावरी दूध संघ आपले अस्तित्व टिकवून आहे, भारतात सर्वप्रथम गोदावरी दृूध संघाच्या कार्यक्षेत्रात सॉर्टेडसिमेन ही सेवा सुरु करण्यात आलेली आहे.त्याद्वारे ९३ टक्के कालवडींची पैदास झालेली असून या कालवडी आजरोजी दूध उत्पादनास देखील तयार झालेल्या आहेत. या कालवडींपासून प्रत्येकी सुमारे २८ लिटर्स
दूध मिळते.हा या उपक्रमातला उच्चांक आहे. सॉर्टेडसिमेनची सेवा पुरविण्यासाठी संघाच्या कार्यक्षेत्रात ३४ कृत्रिमरेतन केंद्रे कार्यरत असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर दूध उत्पादक शेतकऱ्यांना ही सेवा पुरविली जाते.याशिवाय राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडून संघाच्या कार्यक्षेत्रातील उत्पादकांसाठी अनुदानावर बायोगॅस युनिट देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गाई खरेदीसाठी तसेच गोठा निर्मिती,चारा,पाणी, पशुखाद्य,मिल्कींग मशिन अशा उपकरणांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याची देखील सुविधा देण्यात आलेली
आहे.संघात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या परिवारास सुमारे २० लाख रुपयाचा संरक्षण विमा देण्याची सुविधा देखील संघाने केलेली असल्याचे शेवटी परजणे यांनी सांगितले आहे.
प्रारंभी संघाचे संस्थापक स्व.नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.श्रध्दांजली ठरावाचे वाचन संचालक उत्तमराव माने यांनी केले.सभेतील सर्व विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा होवून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृताचे वाचन केले.
कोरोना महामारीतील सर्व नियमांच्या अधिन राहून सभा खेळीमेळीत पार पडली.संघाचे माजी संचालक ज्ञानदेव गुडघे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले आहे.