कोपरगाव तालुका
खावटी योजनेचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या आदिवासी कुटुंबासाठी महत्वाचा आधार असलेल्या खावटी योजनेचे लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या समक्ष सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच तहसील कार्यालय कोपरगाव येथे बैठक घेतली. आज विविध आदिवासी योजनांबद्दल तहसील कार्यालय कोपरगाव येथे आढावा बैठक घेतली.
या बैठकीसाठी आदिवासी बांधवांसह तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन रोहमारे, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ.काळे यांनी सबंधित विभागाला मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आदिवासी बांधवाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेवून २०१४ पासून बंद असलेली खावटी कर्ज योजना पुनर्जीवित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना मदत व्हावी या उद्देशातून १०० टक्के रोखीने खावटी कर्ज वाटप करण्याच्या निर्णयातून सुत देवून २०२०-२०२ साठी हि योजना १०० टक्के अनुदानित करून ५० टक्के रोख व ५० टक्के वस्तू स्वरुपात या या योजनेचा लाभ आदिवासी बांधवाना मिळणार आहे. या योजनेचा मनरेगावर कार्यरत असलेले मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंबे,पारधी जमातीची सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे, ज्यामध्ये घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या,भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्तीअसलेले कुटुंब व अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंबे तसेच वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्क धारक कुटुंबाना या योजनांचा लाभ होणार आहे. त्यामुळे या खावटी योजना आदिवासी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत तातडीने कशा पोहोचतील व जास्तीत जास्त आदिवासी समाजबांधवांना या योजनेचा कसा लाभ करून देता येईल याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. या योजनांची व खावटी योजनेची सविस्तर माहिती सांगून या योजनांचा लाभ आदिवासी बांधवाना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. अशा सूचना केल्या. तसेच ज्या आदिवासी बांधवांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गटाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या मदतीने या योजनांचा जास्तीत समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.