कृषी व दुग्ध व्यवसाय
…या संस्थेच्या शिष्टमंडळाची कोपरगावातील दूध संघास भेट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास ( सारथी) संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोकराव काकडे यांच्यासह सारथी संस्थेच्या शिष्टमंळाने गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघास नुकतीच भेट दिली आहे. पशुधनाचे आरोग्य,संवर्धन तसेच दुग्ध व्यवसाय वाढीच्यादृष्टीने सारथी संस्थेच्या माध्यमातून काही हितकारी योजना राबविण्याबाबत या भेटीत शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

“सारथीच्या या दौऱ्यात जनावरांच्या लिंग वर्गकृत रेतमात्रा शेतकऱ्यांना सवलतीमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी अनुदान,पशुधनासाठी विम्याचा लाभ, जनावरांना आयुर्वेदिक उपचार,चाऱ्यांकरिता बायाणांची उपलब्धता,जनावरांना खनिज मिश्रण ( मिनरल मिक्चर) उपलब्ध करुन देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प उभारण्याबाबतही सखोल चर्चा झाली आहे”-राजेश परजणे, अध्यक्ष गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघ,कोपरगाव.
सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोकराव काकडे यांच्यासह निबंधक अशोक पाटील, कार्यकारी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, प्रकल्प संचालक सौ. रोहिणी भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. एन. पाटील या शिष्टमंडळासह बायफचे पुणे संस्थेचे अध्यक्ष बी. के. काकडे, राज्य विभागीय संचालक व्ही. बी. दयासा, राज्याचे मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे यांनीही संघास भेट देऊन विविध योजनांविषयी चर्चा केली. प्रारंभी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजय थोरे, तालुका पशुधन लघू चिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे. पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप जामदार, बायफचे कोपरगांव कार्यालयाचे अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर, डॉ. वाघमारे, डॉ. सुधाकर बाबर, संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांची उपस्थिती होती.
सारथी संस्थेचा उद्देश व कामकाजाविषयी व्यवस्थापकीय संचालक अशोकराव काकडे यांनी माहिती दिली.राज्यात पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कोणकोणत्या योजना व उपक्रम राबविता येतील याबाबत शिष्टमंडळाने चर्चा केली. तसेच जनावरांच्या लिंग वर्गकृत रेतमात्रा शेतकऱ्यांना सवलतीमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी अनुदान,पशुधनासाठी विम्याचा लाभ, जनावरांना आयुर्वेदिक उपचार,चाऱ्यांकरिता बायाणांची उपलब्धता,जनावरांना खनिज मिश्रण ( मिनरल मिक्चर) उपलब्ध करुन देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प उभारण्याबाबतही सखोल चर्चा झाली.
गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या अत्याधुनिक सॉर्टेडसिमेन कार्यक्रमाबरोबरच पशु रोगनिदान कार्यशाळा, आयुर्वेदिक औषधालय, पशुखाद्य, मिनरल मिक्चर, चारा पुरवठा, गाई खरेदी व गोठ्यासाठी कर्जपुरवठा, संघाशी संलग्न असलेल्या कर्मचारी व दूध उत्पादकांसाठी २० लाखाचा विमा, दूध संकलन करणाऱ्या संस्थांना बल्क कुलरची व्यवस्था, दूध तपासणीसाठी संगणकीय यंत्रणा अशा विविध योजना व उपक्रमांची अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी शिष्टमंडळास माहिती दिली. सहाय्यक आयुक्त डॉ. अजय थोरे यांनी आभार व्यक्त केले. संघातील भेटीनंतर या शिष्टमंडळाने संघाच्या कार्यक्षेत्रातील सोनेवाडी येथील दूध उत्पादकांशी संवाद साधून गोठ्याची पाहणी केली. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी, बेरोजगार युवक, महिलांच्या प्रगतीसाठी सारथी संस्थेकडून कशा प्रकारे कर्जपुरवठा करता येईल याबाबत वरिष्ठ पातळीवर सखोल चर्चा करुन निर्णय घेण्याचे सूतोवाच शिष्टमंडळाने केले.