कोपरगाव तालुका
कोरोना साथीच्या काळातही शिक्षकांचे कार्य लक्षवेधी-कौतुक
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी शाळा बंद असल्या तरी संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक परिश्रम घेऊन ऑनलाईन च्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम करीत आहे. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला विदयार्थी व पालक यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून कोरोना संकटातदेखील आपल्या संस्थेचा शैक्षणिक परंपरेचा नावलौकिक टिकून असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
कोरोनाची साथ सुरु होऊन सहा महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप कोरोना साथ कमी होण्याची लक्षणे नसतानाही शिक्षक,प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ज्ञानयज्ञ खंडित होऊ नये यासाठी सलग प्रयत्न सुरु ठेवले आहे.हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे-आ.आशुतोष काळे.
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,सचिव चैताली काळे,विश्वस्त कारभारी आगवण,सिकंदर पटेल,भास्करराव आवारे,ज्ञानदेव मांजरे,बाळासाहेब बारहाते,एम.टी.रोहमारे आदी मान्यवरांसह सर्व शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या सचिव चैताली काळे म्हणाल्या की,”कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य आपली संस्था करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या यशाच्या शिखरावर घेऊन जाऊन त्यांना सक्षम बनवायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात होणारे बदल हे स्वीकारावे लागणार असून आपल्या संस्थेने हे बदल स्वीकारून आधुनिक शिक्षणाचा नवा पायंडा पाडला आहे.
सर्वप्रथम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व.शंकरराव काळे व स्व.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.सभेच्या अध्यक्ष पदाची सूचना डॉ.चंद्रशेखर आव्हाड यांनी मांडली.सदर सूचनेस बाळासाहेब बारहाते यांनी अनुमोदन दिले.श्रद्धांजलीचा ठराव माजी विश्वस्त एम.टी.रोहमारे यांनी मांडला.सूत्रसंचलन केशव दळवी यांनी केले तर उपस्थितांचे आभार कारभारी आगवण यांनी मानले आहे.