कोपरगाव तालुका
कालबाह्य तिथीच्या आधी मिठाईला बुरशी ?
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आगामी कालखंडात हॉटेलमधील मिठाईवर कालबाह्य तिथी टाकण्याचा अध्यादेश काढला असतानाच कोपरगावात गुजरात मधील प्रसिद्ध “अमूल” या प्रसिद्ध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मिठाईवर मुदत संपण्याच्या आधीच त्या मिठाईवर बुरशी दिसून आल्याची बाब निदर्शनात आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आपण हा माल शिर्डी येथील ठोक विक्रेते यांचेकडून घेतला होता.मात्र तो लगेच खराब झाल्याचे कबुल केले असून आधी कंपनीच्या वितरकांनी या मालास परत घेता येणार नसल्याची बतावणी केली होती.मात्र या बाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधित माल बदलून देण्याचे कबूल केले आहे-सुधीर डागा,संचालक,बालाजी सुपर मार्केट,कोपरगाव.
शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशान्वये ५० टक्के क्षमतेनुसार हॉटेल्स,फुड कोर्ट,रेस्टाँरट व बार हे ५ ऑक्टोबर पासून सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हयात हॉटेल,रेस्टॉरंट या आस्थापना चालू करण्यास दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत. महाराष्ट्र शासन व पर्यटन विभाग यांनी ज्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या सूचनेनुसार विशेषत: हॉटेल,बार,रेस्टॉरंट यांच्याकडून या आदेशाची योग्य रितीने अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी साथ नियंत्रण कायदा,१८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ मधील तरतुदींनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये काही मानक कार्यप्रणाली निर्गमित केली आहे.त्याच बरोबर हॉटेलमधील मिठाईवर या पुढे ती बंगल्याची तारीख व कधी कालबाह्य होणार याबाबत तारीख टाकण्याचे बंधनकारक करून ग्राहकांना सुरक्षा प्रदान करण्याचा स्तुत्य निर्णय घेऊन त्या निर्णयाची शाई अद्याप वाळलेली नसताना कोपरगाव शहरातील प्रसिद्ध “बालाजी सुपर मार्केट” या दुकानात गुजरात मधील प्रसिद्ध ब्रँड असलेला दुग्ध उत्पादनातील “अमूल” या कंपनीच्या एका मिठाईच्या बॉक्सवर ती बंदिस्त केल्याची तारीख या माहिन्याचीच असून ती कालबाह्य होण्याची तारीख दोन महिन्याची आहे.मात्र ती मिठाई बंदिस्त करून काही दिवसांचा अवधी होत नाही तोच तिला बुरशी लागल्याची तक्रार कोपरगाव येथील बालाजी सुपर मार्केटचे संचालक सुधीर डागा यांनी केली आहे.या बाबत सामाजिक संकेतस्थळावरही हि बातमी प्रसारित झाली असून याबाबत बेपर्वाई करणाऱ्या या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने बालाजी सुपर मार्केटचे संचालक सुधीर डागा यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपण हा माल शिर्डी येथील ठोक विक्रेते यांचेकडून घेतला होता.मात्र तो लगेच खराब झाल्याचे कबुल केले असून आधी कंपनीच्या वितरकांनी या मालास परत घेता येणार नसल्याची बतावणी केली होती.मात्र या बाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधित माल बदलून देण्याचे कबूल केल्याचे सांगितले आहे.ग्राहक हिताची पायमल्ली झाल्याबद्दल अनेकांनी या कंपनीचा निषेध व्यक्त केला आहे.