कोपरगाव तालुका
औषधांच्या नावाखाली पाण्याचे सडे मारणाऱ्यांना गांभीर्य नाही-टीका
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जागतिक कोरोना संकटात मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळे इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच होती.मात्र चर्चेत राहण्यासाठी ज्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळून औषध फवारणीच्या नावाखाली सर्रासपणे पाण्याचे सडे मारले त्यांनी शहाणपणा शिकवू नये असा टोला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे यांनी माजी.आ.कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.
जीवघेण्या संकटात फक्त मार्च महिन्यातच खोटा देखावा करणाऱ्या आपल्या नेतृत्वाचे योगदान काय ? असा सवाल करून त्यांनीं बोलती बंद करावी.आपला निष्काळजीपणा आपल्या उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतला आहे. त्यामुळे आपण जर आपल्या उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांचीच चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर बरे होईल-सूर्यभान कोळपे
कोपरगाव तालुक्याच्या ईशान्य गडावरील उपगडपतीने आ.काळे यांच्यावर नुकतीच टीका केली होती.त्या टीकेचा कर्मवीर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले त्यात हा समाचार घेतला आहे.त्यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”ज्यावेळी कोपरगाव शहरात १० एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासुन आ.काळे हे सातत्याने प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत.कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाला व प्रशासनाला येणाऱ्या अडचणी त्यांनी तातडीने सोडविल्या आहेत.त्यामुळे काही तालुके कोरोनाचे केंद्र ठरले असतांना कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या नगण्य होती.मात्र टाळेबंदीमुळे सर्व सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या.थांबलेल्या अर्थचक्राची गाडी पुन्हा रुळावर यावी यासाठी जून महिन्यापासून टाळेबंदीत शासनाच्या वतीने घालण्यात आलेल्या अटी शिथिल करून टाळेबंदी उठवणे सुरु झाले. व टप्या टप्प्याने बहुतांश निर्बध शिथिल केल्यापासून राज्यात व जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली व दुर्दैवाने कोपरगाव तालुक्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे.मात्र याचे कुणी राजकारण करीत असेल तर ते अत्यंत चुकीचे असून तालुक्यातील जनतेचे दुर्दैव आहे.अशा जीवघेण्या संकटकाळी सामुहिकपणे या संकटाचा मुकाबला करायचा सोडून आपली राजकीय पोळी शेकून घेणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
आज कोपरगाव शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून यामध्ये आपल्या ईशान्य गडावरील कर्मचारी आहेत याचे भान ठेवावे.मागील महिन्यात काही दिवस तर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आपल्या उद्योग समुहातील बाधित रुग्णाच्या संख्येने केलेल्या उच्चांकाचा तुम्हाला विसर पडला का ? एकाच दिवशी सापडलेल्या ६५ रुग्णांपैकी आपल्या या उद्योग समूहातील जवळपास ४२ रुग्ण होते.याचा तुम्हाला विसर पडू शकतो मात्र जनता विसरणार नाही.कोरोना संकटाचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यात पहिली बैठक घेवून उपाय योजना करणारे आ.काळे एकमेव असून तालुक्याच्या जनतेची काळजी घेण्यासाठी ते समर्थ आहेत.याउलट या जीवघेण्या संकटात फक्त मार्च महिन्यातच खोटा देखावा करणाऱ्या आपल्या नेतृत्वाचे योगदान काय ? असा सवाल करून त्यांनीं बोलती बंद करावी.आपला निष्काळजीपणा आपल्या उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतला आहे. त्यामुळे आपण जर आपल्या उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांचीच चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर बरे होईल. ज्याप्रमाणे कोपरगाव शहरात औषध फवारणीच्या नावाखाली पाण्याचा सडा मारला अशी टीका करून राजकारण करण्यासाठी दुसरे मुद्दे शोधा पण या महामारीचे राजकारण करू नका असा उपरोधिक सल्ला सूर्यभान कोळपे यांनी शेवटी दिला आहे.