निधन वार्ता
माजी सभापती परजणे यांचे निधन

न्युजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव पंचायत समितीचे माजी सभापती व संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी कारभारी (भाऊ) लक्ष्मणराव परजणे यांचे गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.४५ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी ते ९४ वर्षाचे होते.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

स्व.कारभारी परजणे यांनी कोपरगाव पंचायत समितीचे अल्पकाळ सभापती पद भूषवले होते याशिवाय जिल्हा परिषद सदस्य,कोपरगांव पंचायत समितीचे सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते.
कै.कारभारी परजणे पाटील हे भाऊ या नांवाने सर्वत्र परिचित होते.त्यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून लौकीक होता.दिवंगत नेते नामदेवराव परजणे तसेच संजीवनी कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व.शंकरराव कोल्हे यांचे विश्वासू सहकारी म्हणून या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले.जिल्हा परिषद सदस्य,कोपरगांव पंचायत समितीचे सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते.
याशिवाय कोपरगांव तालुका पातळीवरील विविध समित्या व संस्थांवर त्यांनी काम केलेले होते.महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच ज्योतीष शास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणूनही ते परिचित होते.खंडकरी शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.मनमिळावू व धार्मिक स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते.त्यांच्यामागे सखाहरी,सुदाम,देवराम,सूर्यभान,बापुसाहेब परजणे हे बंधू तर शंकर हे चिरंजीव तसेच तीन बहिणी,सुना,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.
त्यांचेवर संवत्सर येथे गोदावरी काठावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.महानुभाव पंथीय ग्रंथामधील पंधराव्या अध्यायाचे वाचन करुन अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली.कै.कारभारी परजणे पाटील यांच्या निधनामुळे संवत्सर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.