कोपरगाव तालुका
तर आपण…’त्या’गाड्या जाळून टाकू” आ.काळेंचा तोल ढळला ?

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळूचोरी आणि वाढलेला भ्रष्टाचार याने तालुका पोखरून निघाला आहे.माजी आ.अशोक काळे यांनी मंजूर करून आणलेला धारणगाव -कुंभारी पुलाजवळ कोणताही अदमास न पाहता त्याला वाळूचोरांनी सुरुंग लावला आहे.त्यामुळे याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच संतप्त कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी वाळूचोरी थांबली नाही तर अवैध वाळूचोरांच्या गाड्या आपण जाळून टाकू व त्यांना गोळ्या घालू असा रोखठोक इशारा यांनी दिला आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

“कोपरगाव येथील महसूल आणि पोलिस यांची संयुक्तपणे अवैध वाळू चोरांवर कारवाई केली नाही तर आपण कायदा हातात घ्यायला व वाळू चोरांना गोळ्या घालण्यास व त्यांची अवैध वाळूची वाहने जाळून टाकण्यास तयार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात गंभीर गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत सातत्याने भर पडत आहे.मागील वर्षी शहरातील एक वकील,एक लेखापरीक्षक आणि एक डॉक्टर यांच्या एका रात्रीत तीन चारचाकी गाड्या (कार) चोरट्यांनी हातोहात लंपास केल्या होत्या.त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही.अन्य चोऱ्या,अवैध व्यवसाय,पुरवठा विभागातील राजरोस धान्य चोरी,वाळूचोर आणि त्यात सामील गुंड पोलिस आणि महसूल विभागास नाक खाजून दाखवत आहेत.गावठी कट्टे तर किराणा दुकानात सामान मिळावे असे सहज मिळत आहेत.या घटना पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये वाचावयास मिळत असत.पण त्याची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात आणि साखर पट्ट्यात आता सहज होत आहे.कोपरगाव शहर आणि तालुका त्याला अपवाद नाही.महसूल विभागात सरासरी दोन-तीन महिन्यात लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी आढळत आहे.लाचलूचपत विभाग त्यांना बेड्या ठोकत आहेत.गोवंश हत्या तर नित्य पाचवीला पूजेला आहेत.श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी इशारा देऊनही गोहत्या बंद झालेली नाही आणि दक्षिण भारतात आपल्या काठी सर्वाधिक पवित्र तीर्थे असलेली गोदावरी नदी रक्तात रंगण्याची थांबलेली नाही हे विशेष ! हे सर्व घडते आहे ते नगरपरिषद आणि पोलिसांच्या नाकाखाली.शहर आणि तालुका पोलिस आणि महसूल विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याने वाळू चोरीतील घटनात दिवसेंदिवस भर पडत आहे.अवैध वाळूत प्रचंड पैसा मिळत असल्याने ते कोणालाही जुमेणासे झाले आहे.वाळू चोऱ्यांचे धाडस इतके वाढले आहे की महसुली अधिकाऱ्यांवर ते रेकी करत असून अधिकाऱ्यांची खडांखडा त्यांना माहिती असते नव्हे अधिकाऱ्यांचे वाहन कार्यालयाबाहेर पडले रे पडले की त्यांची टोळ धाड त्यांचा दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या सहाय्याने पाठपुरावा करायला लागते.अधिकारी कोणाशी बोलताना दिसतात,कार्यालय सोडले,घरी गेले,थांबले,पाणी पितात,जेवण करतात आणि याची सर्व माहिती ते मुख्य वाळूचोरांस देतात परिणाम असा होतो की,अधिकारी नदीच्या दिशेने गेले की तेथील फरांड्या आणि अवजड वाहने काही मिनटात फरार होतात.असा सारा खेळ सुरू असतो मात्र यात त्यांना एक खुबी माहिती झाली आहे.महसूल आणि पोलिस यंत्रणा यांच्यात एक वाक्यता नसल्याने त्यांना त्यातून मोठी संधी सापडत असते.आता तर त्यांनी उन्हाळा असल्याने नदी पात्रातील पाणी आटून गेले आहे.गोदापात्रात असलेली वाळू जवळपास संपल्यात जमा झाली आहे.परिणामी त्यानी आता कोणताही मुलाहिजा न बाळगता गोदावरी नदी ओलांडण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणाऱ्या धारणगाव आणि कुंभारी येथील गावांना जोडणाऱ्या पुलाला सुरुंग लावला आहे.पुलाखालील वाळू चोरून नेण्यास कोणाची तमा बाळगली नाही हे विशेष ! याबाबत राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगाराच्या विकास कामांची पाहणी करण्यास आज सायंकाळी ५.३० वाजता आले असता उपस्थित प्रतिनिधीनी विचारणा केली असता आ.आशुतोष काळे यांचा एका अनामिक क्षणी तोल ढळला आहे.त्यांनी थेट वाळू चोरांना गोळ्या घालण्याची व अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळ्यांना थेट गोळ्या घालण्याची व वाहनांना जाळून टाकण्याची व थेट भाषा केली असून त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर झाला आहे हे या निमित्ताने पुढे आले आहे.
त्यावेळी त्यांनी पुढे बोलताना म्हंटले आहे की,”माजी आ.अशोक काळे यांनी जनतेची पूर्व आणि पश्चिम भागास जोडणाऱ्या पुलास मोठ्या मुश्किलीने मंजुरी आणली होती.आणि त्यामुळे तालुक्याचे दळणवळण सुस्थितीत आणले असताना आज त्याला कोणी सुरुंग लावत असतील तर ही बाब गंभीर असून ही बाब आपण पोलिस आणि महसूल यांना खाजगीत लक्षात आणून दिली आहेच पण शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे लक्षात आणून दिली आहे.महसूल आणि पोलिस यांची संयुक्तपणे त्यावर कारवाई केली नाही तर आपण कायदा हातात घ्यायला तयार आहे.त्यामुळे तालुक्यात वाळूचोरीची बाब किती गंभीर झाली आहे हे आमच्या प्रतिनिधीने वारंवार दाखवून दिले आहेच पण आज आ.काळे यांचाच याबाबत सहनशीलता संपल्याने त्यांचा या गंभीर प्रकरणी वाळू चोरांच्या हैदोसाचा अतिरेक झाल्याने तोल सुटल्याचे पून्हा एकदा उघड झाले आहे.