सण-उत्सव
शिर्डीत श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला प्रारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था व नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ०९ ऑगस्ट ते सोमवार दिनांक १६ ऑगस्ट २०२१ याकालावधीत कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे आभासी (Virtual) पध्दतीने साजरे करण्यात येणा-या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली आहे.
आज सकाळी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची समाधी मंदिरातून गुरुस्थान व व्दारकामाई मार्गे स्टेजपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी विणा,उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी,मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा व मंदिर पुजारी दिगंबर कुलकर्णी यांनी कलश घेवून सहभाग घेतला.
यावेळी संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व पुजारी उपस्थित होते. मिरवणूक पारायण मंडपात आल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते ग्रंथ व कलश पूजन करुन श्री साईसच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला.
मंदिर पुजारी बाळासाहेब जोशी व दिंगबर पुजारी यांच्यामार्फत सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत श्री साईसच्चरिताचे ०१ ते ०७ अध्यायांचे वाचन करण्यात आले. तसेच यावेळेत पारायण वाचनाचे युट्युब (youtube) – https://youtube.com/user/saibabasansthantrust, फेसबुक पेज (Facebook Page) – https://www.facebook.com/shrisaibabasansthantrustshirdi/ व वेबसाईट (website) – www.sai.org.in या लिंकवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.