कोपरगाव तालुका
तरुणांनी आपल्या उर्जेला योग्य दिशा दिल्यास यश-प्राचार्य कदम
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तरुणांमध्ये अफाट उर्जा भरलेली आहे.तिला फक्त योग्य दिशा देता आली पाहिजे.अनेकदा यशाकडे जाण्याचा रस्ता हरवल्याची परिस्थिती जीवनात येत असते.अशा वेळी हिंमत न हारता तरुणांनी आपली वाटचाल सुरूच ठेवण्याची गरज आहे असल्याचे प्रतिपादन पुणे येथील प्रसिध्द साहित्यिक व शिवव्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांनी संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“विचारातून मस्तक आणि मस्तकातून हस्तक सुधारते तेव्हा त्यातून निर्माण होणारे कार्य समाजासाठी प्रेरक ठरते.माणसाने एकमेकांसाठी आयुष्य वेचणे यालाच खरी समाजसेवा म्हणतात.या उद्देशाने संवत्सर येथे सुरु झालेली ही व्याख्यानमाला विचाराच्या सुंदर आणि निर्मळ प्रवाहासारखी आहे”-अनिल गुंजाळ,शिक्षण तज्ज्ञ,पुणे.
गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या १९ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित व्याख्यानातून ‘ प्रेरणा युवकांसाठी..’ या विषयावर प्राचार्य कदम बोलत होते. शिक्षणतज्ज्ञ अनिल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे संत परमानंद महाराज,संत विवेकानंद महाराज,संत चंद्रानंद महाराज, संत राजानंद महाराज,संत प्रेमानंद महाराज तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक विलासबापू बडगे,महंत दामोदरबावा महानुभाव,नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरदराव नवले,धनश्री विखे पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्व.नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत केले. संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या ‘गोदानाम संवत्सरे ‘ आणि कोपरगाव येथील महिला महाविद्यालयालयाच्या ‘कृपासिंधू ‘ या वार्षिक नियतकालिकांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे धनादेश तर गरीब विद्यार्थ्यांना सहाणे बंधू यांच्यावतीने शालेय गणवेश वितरीत करण्यात आले.
उठा,जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांगू नका हे स्वामी विवेकानंदांचे विचार जर युवकांच्या मनाला प्रेरीत करीत असतील आणि त्याद्वारे युवकांच्या हातून काही चांगले कार्य घडत असेल तर राष्ट्राच्या जडणघडणीला युवकांचा निश्चितच हातभार लागेल असे सांगून प्राचार्य कदम पुढे म्हणाले,”आजकालची पिढी कुठलेही कष्ट न करता यश मिळविण्याची अपेक्षा ठेवतात हे योग्य नाही.कष्ट करण्यासाठी आधी इच्छाशक्ती तुम्हाला प्रबळ करावी लागेल.आपल्यातली अनंत शक्ती प्रकट करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला तरच यश मिळेल,अन्यथा आयुष्य लोखंडाससरखे गंजून पडेल.गेलेला भूतकाळ आणि येणारा भविष्यकाळ यातला दुवा म्हणजे युवक अशी युवकांची व्याख्या आपल्याला करता येईल.सशक्त,सश्रध्द आणि सतेज युवक ही राष्ट्राची खरी शक्ती आणि आधार आहे.आपल्या शक्तीचा वापर कुणाच्या फसवणुकीसाठी करू नका,प्रेम,सत्यनिष्ठा आणि प्रचंड उत्साह याद्वारे सत्कर्म करा.समाजासाठी जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात.समाजातील विषमता दूर करुन समानता प्रस्तापित करण्यासाठी महात्मा ज्योतीबा फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला.समाजाला दिशा देण्याचे दीपस्तंभासारखे अद्वितीय कार्य त्यांनी केले.त्यांच्या कार्यातून युवकांनी प्रेरणा घेऊन अंधारात चाचपडणाऱ्या लोकांना दिशा दाखविण्याचे काम करावे.दुर्बलतेचा विचार आणि चिंतन करीत बसणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही.त्यासाठी सामर्थ्यशाली विचारांची आज नितांत गरज आहे.स्वत:वर विश्वास ठेवा,विश्वास अढळ ठेवण्यासाठी शक्तीशाली बना.आपले ध्येय निश्चित करा.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात कुणावरही अन्याय,अत्याचार होऊ दिले नाहीत,हीच तर आमची हिंदू संस्कृती आहे.हा आदर्श सोबत घेऊन युवकांनी वाटचाल करण्याची आज गरज आहे असे सांगून प्राचार्य कदम यांनी प्रेम,सकारात्मकता,मूल्यांची जपणूक,जीवनविषयक तत्वज्ञान,परिश्रमाचे महत्त्व आणि दिव्यत्वाची स्वप्ने पाहणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करुन संवत्सर परिसरात स्व.नामदेवराव परजणे यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील व राजेश परजणे पाटील यांनी संवत्सर व कोपरगांव परिसरामध्ये सुरु केलेल्या शैक्षणिक कार्याचा महायज्ञ भविष्यातही अखंडपणे सुरू रहावा अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्यात.
शिक्षणतज्ज्ञ अनिलराव गुंजाळ यांनी युवकांना मार्गदर्शन करताना,”विचारातून मस्तक आणि मस्तकातून हस्तक सुधारते तेव्हा त्यातून निर्माण होणारे कार्य समाजासाठी प्रेरक ठरते.माणसाने एकमेकांसाठी आयुष्य वेचणे यालाच खरी समाजसेवा म्हणतात.या उद्देशाने संवत्सर येथे सुरु झालेली ही व्याख्यानमाला विचाराच्या सुंदर आणि निर्मळ प्रवाहासारखी असल्याचे सांगून स्व.परजणे यांच्या सुसंस्कृत जीवन वाटचालीची आठवण करुन दिली.
याप्रसंगी शालिनी विखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे महंत परमानंदगिरी महाराज यांनी ‘जंगली तू माय मी लेकरू,कैसा तुला विसरू..’हे गीत सादर करुन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते