शैक्षणिक
आषाढी एकादशीच्या निमित्त…या विदयालयात रंगला दिंडी सोहळा..!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात याही वर्षी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.सदर प्रसंगी विदयार्थी वारकरी बनून त्यांनी दिंडीचे आयोजन केले होते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.तर कोपरगावसह राज्यभर हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
सदर प्रसंगी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर,अशा भक्तिमय वातावरणात शहरातील मुख्य मार्गावर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयचा विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला.विठ्ठल-रखुमाई,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,आदि संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.
शाळेतील काही वर्गातील मुल,मुली सकाळी शाळेच्या मैदानावर जमले.पालखी तयार करुन त्यात विठ्ठलाची प्रतिमा पूजन करुन ठेवण्यात आली होती.मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन यामुळे आपण साक्षात पंढरपुरच्या वारीत असल्याचा भास होत होता. लहान मुले आज पांढरा झब्बा,डोक्यावर टोपी,कपाळी बुक्का,गळ्यात टाळ आणि मुली नऊवारीत आलेल्या व केसात गजरा,डोक्यावर तुळस यामुळे दिंडीचे वातावरण उत्साह पुर्ण झाले होते.
यामध्ये विदयालयांचे विदयार्थीनी ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेच्या क्रीडागंणावर निर्माण करण्यात आले.
सदर दिंडी सोहळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विदयालयांचे शिक्षक ए.जे.कोताडे,ए.बी.अमृतकर,वाय.के.गवळे,सौ.एस.टी.डरांगे,एस.ए.अजमेरे,सौ.पी.डी.तुपसैंदर,सौ.सी.व्ही.निंबाळकर,के.एस.गोसावी,डी.पी.कुडके,पी.बी.जगताप आदि शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले होते.
या विद्यार्थींच्या दिंडी आयोजना बद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे,अमोल अजमेरे,राजेश ठोळे आदिंनी विदयार्थाचे कौतुक केले आहे.विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड,पर्यवेक्षिका यु.एस.रायते मॕडम आदि बहुसंख्य शिक्षक,शिक्षिका या विदयार्थी दिंडीत सहभागी झाले होते.