शैक्षणिक
…या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची,’अग्नीवीर’ मध्ये निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागातील कुणाल लांडगे,ऋषिकेश सोनवणे व उमेश सरडे आदी तीन विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीर म्हणून व एका विद्यार्थ्याची कारागृह पोलीस म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी दिली आहे.या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे छात्रसैनिक कुणाल लांडगे,ऋषिकेश सोनवणे व उमेश सरडे यांची भारतीय सैन्य दलामध्ये अग्नीवीर म्हणून निवड झालेली आहे.तर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू मुस्तकीम पीरजादे याची मुंबई येथे कारागृह पोलीस या पदावर निवड झाली आहे”-डॉ.विजय ठाणगे,प्राचार्य,के.जे. सोमैया महाविद्यालय,कोपरगाव.
अग्निवीर योजना ही” भारतीय सशस्त्र दलांमध्ये ” तरुणांना चार वर्षांसाठी भरती करण्याची एक नवीन योजना आहे,ज्यांना अग्नीवीर म्हटले जाते; या योजनेचा उद्देश सैन्याचे प्रोफाइल तरुण ठेवणे आणि तरुणांना देशभक्तीची संधी देणे आहे,ज्यात कामगिरीच्या आधारावर २५% अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेची संधी मिळते,तर उर्वरितांना सेवा निधी पॅकेज मिळते.त्यांच्या सेवा समाप्तीनंतर त्यांना काही अटी शर्तीवर शासकीय सेवेत ही घेतले जाते.अशा अग्नी वीर योजनेत के.जे.सोमय्या महाविद्यालयातील तरुणांची निवड होणे ही भूषणाची बाब मानली जात आहे.

या संदर्भात अधिक माहिती देतांना प्राचार्य डॉ.विजय ठाणगे म्हणाले की,”महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे छात्रसैनिक कुणाल लांडगे,ऋषिकेश सोनवणे व उमेश सरडे यांची भारतीय सैन्य दलामध्ये अग्नीवीर म्हणून निवड झालेली आहे.हे छात्रसैनिक लवकरच ट्रेनिंगसाठी अनुक्रमे बॉम्बे सॅपर्स पुणे,मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव व महार रेजिमेंट सागर येथे रवाना होणार आहेत.तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू मुस्तकीम पीरजादे याची मुंबई येथे कारागृह पोलीस या पदावर निवड झालेली आहे.निवड प्राप्त सर्व विद्यार्थी अनेक महिन्यापासून कठोर परिश्रम घेत होते.सदर निवडीमुळे त्यांच्या परिश्रमाचे चीज झाले असल्याचे मानले जात आहे.”
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद आदींनी विशेष कौतुक केले आहे. सैन्य दलामध्ये अग्नीवीर म्हणून निवड झालेल्या छात्रसैनिकांना छात्रसेना प्रमुख कॅप्टन डॉ.नितीन शिंदे व लेफ्टनंट प्राध्यापिका वर्षा आहेर यांचे मार्गदर्शन लाभले होते.दरम्यान महाविद्यालयाचा राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू मुस्तकीम पीरजादे याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.सुनील कुटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



