
बाभूळगाव : एस. एन. डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅम मोठ्या उत्साहात पार पडला. नवागत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद आणि आत्मविश्वास जागवणारे संदेश देण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती स्वाती पवार (पोलीस उपअधीक्षक, भ्रष्टाचार विरोधी, नाशिक) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील उच्च पदस्थ नोकऱ्या मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा अपरिहार्य टप्पा आहे. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतांचा विकास होतो, तर्कशक्ती आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षांच्या तयारीकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे.”
तसेच, संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. एम. यादव यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि ते नोकरी व उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात यशस्वी व्हावेत, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. एस. एन. डी. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली जाते.”

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विद्या निकम, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एस. एस. येवले, रजिस्ट्रार डॉ. डी. पी. क्षीरसागर, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. ए. धरम यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार श्री. नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री. लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री. रुपेशभाऊ दराडे व श्री. कुणालभाऊ दराडे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.