शैक्षणिक
विद्यार्थीनींनी स्वतः उद्योजक व्हावे -…यांचे आवाहन
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
“विद्यार्थिनींनी आता दुसऱ्याकडे रोजगार किंवा नोकरी मागण्यापेक्षा स्वतःच उद्योजक होऊन दुसऱ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन उद्योजिका मनिषा बारबिंड यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि महिला सबलीकरण कक्षाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे होते.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने “शक्ती अभियान” योजनेसाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिलांची सुरक्षितता,संरक्षण आणि सक्षमीकरण या उद्देशाने सर्वंकष योजना म्हणून केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या वर्ष 2021-22 ते 2025-26 या कार्यकाळातील अंमलबजावणीसाठी ‘शक्ती अभियान’ हा एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरु केला आहे.त्याबाबत विद्यार्थिनी मध्ये जागृती करण्यासाठी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”‘शक्ती अभियान’ही योजना महिलांची सुरक्षितता,संरक्षण आणि सक्षमीकरण यासाठीच्या उपाययोजनांना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मोहीमेच्या स्वरुपात राबविण्यात येत आहे.महिलांच्या जीवन चक्रात त्यांच्यावर सतत परिणाम करणाऱ्या समस्या सोडवून आणि केंद्राभिमुखता तसेच नागरी हक्कांच्या माध्यमातून त्यांना राष्ट्र उभारणीत समान भागीदार करून घेऊन “महिलांच्या नेतृत्वाखालील विकास साधण्याच्या केंद्र सरकारच्या कटिबद्धतेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत असल्याचे सांगून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच हिंसा आणि धाकदपटशामुक्त वातावरणात त्यांना त्यांचे मन आणि शरीर या दोन्हींच्या बाबतीत मुक्तपणे निर्णय घेण्याची संधी मिळणे या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. तसेच महिलांवरील काळजीचे ओझे कमी करणे आणि कौशल्य विकास,क्षमता निर्मिती, आर्थिक साक्षरता,सूक्ष्म-कर्ज मिळण्यातील सुलभता इत्यादी बाबींना प्रोत्साहन देऊन महिला कामगार दलाचा सहभाग वाढविणे ही उद्दिष्टे देखील या योजनेच्या अंमलबजावणीतून साध्य करता येणार आहेत.त्याचा फायदा नवीन विद्यार्थिनी यांनी घेणे गरजेचे असल्याचे शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे म्हणाले की “मुलींनी आता आई वडिलांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनले पाहिजे. वर्तमानस्थितीमध्ये मुलींनी केवळ नोकरीपुरते सीमित न राहता उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे.महिलांना आता सगळीकडे अनेक संधी उपलब्ध आहेत.त्यांचा लाभ घेऊन विद्यार्थिनींनी करिअर करावे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्तविक महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख ग्रंथपाल डॉ.नीता शिंदे यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.कोमल अडसरे यांनी केले असून आभार सुरेखा भिंगारदिवे यांनी मानले आहे.