शैक्षणिक
…या महाविद्यालयाच्या वार्षिक अंकास पुरस्कार जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
…या महाविद्यालयाच्या वार्षिक अंकास प्रथम पुरस्कार जाहीर
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या वतीने शैक्षिणक वर्ष १९६४ पासून सातत्याने प्रकाशित होणाऱ्या ‘गोदातरंग’ या वार्षिक अंकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे.
दरम्यान या पुरस्काराचे वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,कुलसचिव डॉ.विजय खरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ.रविंद्र शिंगणापुरकर,अधिसभा सदस्य डॉ.संदिप पालवे,डॉ. धोंडीराम पवार,विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.अभिजित कुलकर्णी,डॉ.सदानंद भोसले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. शै. वर्ष २०२१-२२ च्या ‘गोदातरंग’ ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ या विशेषांकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ विभागाचा अहमदनगर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सदर पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व रु.०७ हजारांचा धनादेश असे आहे.त्याचबरोबर शै. वर्ष २०१९-२० च्या गोदातरंग ‘पर्यावरण संवर्धन’ या विशेषांकासदेखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ विभागाचा अहमदनगर जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व रु.०५ हजाराचा धनादेश असे आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना शब्दरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्याच उद्देशाने प्रत्येक वर्षी महाविद्यालयामध्ये हा वार्षिक अंक प्रकाशित केला जातो.या वार्षिकांकात दरवर्षी समाजोपयोगी एक मुख्य विषय घेऊन महाविद्यालयातील सर्व शाखांचे विद्यार्थी व प्राध्यापक आपले विचार शब्दबद्ध करीत असतात.विषय-वैविध्य,मौलिक लेखन,समाजोपयोगिता,उत्कृष्ट मुखपृष्ठ या सर्व बाबी विचारात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने ‘गोदातरंग’ या वार्षिक अंकास पुरस्कृत करण्यात आले आहे.
सन २०१९-२० या वर्षीच्या अंकाचे प्रमुख संपादक म्हणून डॉ.गणेश देशमुख,तर २०२१-२२ या वर्षीच्या अंकाचे प्रमुख संपादक प्रो. जिभाऊ मोरे हे होते.विभागीय संपादक म्हणून प्रा.वर्षा आहेर,डॉ.संजय दवंगे,प्रो.संजय अरगडे यांनी काम पहिले.तसेच या दोन्ही अंकांची मुख्यपृष्ठ संकल्पना अनुक्रमे कु.प्रेरणा देशमुख व कु.गौरी सोनवणे यांनी साकार केली होती.
‘गोदातरंग’ या वार्षिक अंकास सातत्यपूर्ण दोन पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे यांनी आनंद व्यक्त करीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, संपादक मंडळ,एक प्रो.बी.बी.भोसले,डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी प्राध्यापक आदींनी अभिनंदन केले आहे.