शैक्षणिक
संवत्सर जि.प.शाळेचे उपक्रम दिशादर्शक-कौतुक
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
चालू शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून राज्य व जिल्हा स्तरावर या शाळेने मिळविलेले यश गौरवास्पद आहे.शाळेतील शैक्षणिक उपक्रम राज्यातील इतर शाळांना दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार अ.नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीं विखे पाटील यांनी काढले आहे.
याप्रसंगी १५३ विद्यार्थ्यांचा सुंदर हस्ताक्षर प्रकल्प सुरु करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या “वुई लर्न इंग्लिश ” या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी सुंदर सादरीकरण केले आहे.
संवत्सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा १५३ वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना त्या बोलत होत्या.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी शिक्षक फय्याजखान पठाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.संवत्सर शाळेत राबविले जाणारे विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राज्यातील शाळांसाठी मार्गदर्शक आहेत.
सन २०२२-२०२३ यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.चि.स्वरुप गराडे हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत २८० गुण मिळवून सहावा तर जिल्ह्यात प्रथम आला आहे.तसेच १० विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत असे घवघवीत यश मिळवणारी संवत्सरची जिल्हा परिषद शाळा आदर्श असल्याचे सांगून शाळेच्या यशस्वी वाटचालीत राजेश परजणे यांचेही बहुमोल मार्गदर्शन व योगदान असल्याचेही सौ.विखे पाटील यांनी सांगितले.तर शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही शाळा यशोशिखरावर असून आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी या शाळेतून घडलेले आहेत.गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे संवत्सर शाळेची पटसंख्या दरवर्षी वाढत असल्याची माहिती राजेश परजणे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिली.
यावेळी सौ.विखे यांच्याहस्ते सर्व शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल विठ्ठल-रुखमाईची मूर्ती देऊन गौरविण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा वरगुडे यांचाही सत्कार करण्यात आला.शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.राजेश परजणे यांनी स्व.नामदेव परजणे यांच्या स्मरणार्थ शाळेच्या स्थापनादिनानिमित्त मुख्य शालेय इमारतीच्या रंगकामासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.शाळेच्या आवारात सौ.विखे यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास दिलीप तिरमखे,योगेश गायकवाड,कृष्णा वरगुडे आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन फैय्याजखान पठाण यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांना केक आणि लाडूचे वाटप करण्यात आले आहे.