निधन वार्ता
माजी केंद्रीय मंत्री गांधी यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे दिल्ली इथे निधन झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे घडली आहे. ते ७० वर्षांचे होते.कोरोनाची लागण झाल्याने गांधी यांची प्रकृती अत्यवस्थ होती. दिल्लीत खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. १७ मार्च रोजी त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला आहे.
“माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी हे जण सामान्यांचा आवाज होते.त्यांनी नगर जिल्ह्यातील अनेक प्रश्न धसास लावले होते.त्यांच्या निधनाने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
गेल्या काही दिवसांपासून गांधी दिल्लीतच असल्याची माहिती मिळते आहे.त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली आणि त्यात ते कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांचे मेदांता हॉस्पिटल, गुरुग्राम दिल्ली येथे उपचारादरम्यान आज पहाटे ३.३० वा निधन झाले आहे.त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.मंगळवारीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.ते अत्यंत मितभाषी म्हणून ओळखले जात.त्यांना प्रारंभीच्या कालखंडात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान पाटील वहाडणे यांचे मोठे मार्गदर्शन लाभले होते.
त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे,विनायक गायकवाड,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,नामदेवराव जाधव,माजी नगरसेवक संजय कांबळे,आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ते नगर लोकसभा मतदार संघाचे २००९ पासून तीन वेळेस खासदार तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात अवजड उद्योगाचे केंद्रीय राज्य मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली होती.एप्रिल २०१९च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी देताना डावलले होते.त्यामुळे त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती मात्र त्यांना पूर्व पदावर आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना यश आले होते.त्याचा परिणाम म्हणून खा.सुजय विखे यांचा विजय सुकर झाला होता.२००९ साली त्यांनी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सोबत तर २०१४ साली त्यांनी खा.सदाशिव लोखंडे यांच्या समवेत दिल्लीत नगर जिल्ह्याचे प्रश्न मांडून न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला होता.२०१४ च्या विजयानंतर त्यांनी केंद्रात मंत्रिपदासाठी मोठा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी वाजपेयी-अडवाणी पर्व संपून मोदी शहांपर्व सुरू झाल्याने त्यांच्या पदरात निराशा पडली होती.मात्र त्यांनी अल्पसंख्यांक कार्ड वापरले त्यावेळी मोदी -शहा प्रभावशाली जोडगुळीच्या नाराजीचा फटका त्यांना बसला होता.
त्यांना शेवटी-शेवटी नगर अर्बन बँकेच्या प्रकरणी मोठ्या चौकशांचा सामना करावा लागला होते.त्यातच ते खचले असावे असे दिसते.नगर अर्बन बँकेच्या प्रकरणामुळेच त्यांची २०१९ची लोकसभेची उमेदवारी गमवावी लागली होती.भाजपचा स्थानिक एक मोठा गट त्यांच्या विरोधात अखेरच्या कालखंडात कार्यरत होता.त्याचा मोठा फटका त्यांच्या राजकीय कारकिर्दीस बसला असल्याचे मानले जाते.त्यांनी २००९ सालच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून आणण्यात मोठी भूमिका निभावली होती.