निधन वार्ता
माजी कार्यकारी संचालक मुजगुले यांचे निधन
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील मूळ रहिवासी कोपरगाव सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून पद भूषविलेले सी.एस. मूजगुले (वय -92)यांचे काल सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,नातवंडे,असा परिवार आहे.ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अ.नगर जिल्हा चिटणीस सचिन मुजगुले व परेश मूजगुले यांचे पिताश्री होते.
स्व.सी.एस.मुजगुले यांनी आपल्या सेवेची सुरुवात कोळपेवाडी येथील कोपरगाव सहकारी साखर कारखान्यापासून केली होती.त्यांनी आधी ओव्हर्सियर पदावर आपली सेवा सुरू करून त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांची पदोन्नती होऊन शेतकी अधिकारी पदावर रुजू झाले होते.त्यानंतर त्यांनी कार्यकारी संचालक पदावर रुजू होऊन नाशिक सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती.त्यानंतर त्यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्यात कार्यकारी संचालक पदावर रुजू होऊन आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.
या शिवाय त्यांनी राहुरी सहकारी साखर कारखान्यात याच पदावरून आपले कर्तव्य निभावले होते.अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना उभारणीत सन-1992-93 च्या काळात मोठे योगदान दिले होते.तेथे तब्बल आठ वर्षे सेवा दिल्यावर त्यांनी सन-1998 साली सेवानिवृत्ती पत्करली होती.त्यांच्या पत्नीचे सात वर्षापूर्वी निधन झाले होते.त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली होती व ते अंथरुणास खिळून राहिले होते.त्यांच्यावर पोहेगाव येथील स्मशान भूमीत आज सकाळी 9.30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाबद्दल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मंत्री मधुकर पिचड,माजी खा.प्रसाद तनपुरे,माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.