कृषी व दुग्ध व्यवसाय
‘मागेल त्याला वैयक्तीक शेततळे’ शेतकऱ्यासाठी सरकारची योजना !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शाश्वत सिंचनासाठी कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे योजना’ अनेक वर्षापासून राबविली जात आहे.या योजनेत कालानुरूप बदल झाला असून आता या योजनेला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना म्हणून ओळखले जाते.या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग,फुलशेती,भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते.
शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीचा विचार करता शेततळे खोदण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना शक्य होत नाही.या सर्व गोष्टींचा विचार करुन शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून वैयक्तिक शेततळ्यांचा या योजनेत समावेश केला आहे.
लाभार्थी पात्रता-
अर्जदार शेतकऱ्यांकडे – स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे : –
जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
लाभार्थी निवड –
शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळ CSC केंद्रावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड होईल.
या योजनेसाठी लाभार्थ्याने महा डीबीटी – पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा. https:// mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून शेततळ्यासाठी वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करावी. आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे व वैयक्तिक तपशील व मोबाईल क्रमांक इ. माहिती भरावी. अर्जाचे शुल्क २३ रुपये ६० पैसे असे आहे. अर्जासोबत ७/१२, ८ अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबूक, जातीचा दाखला व हमी पत्र इ. कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
योजनेच्या अटी व शर्ती-
कृषी विभागाच्या कृषी सहायकांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक आहे.शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करावे.बँक खाते क्रमांक कृषी सहायकांकडे सादर करावा.कामासाठी अग्रीम दिला जात नाही. शेततळ्याच्या बांधावर स्थानिक झाडे लावावीत.शेततळ्याचे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी लाभार्थीची आहे.
असे मिळते अनुदान –
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १४ हजार ४३३ रुपयांपासून ७५ हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेत अनुदान दिले जाते. हे अनुदान शेततळ्याच्या प्रकारानुसार व आकारानुसार दिले जाते. शेततळ्याचा आकार १५ बाय १५ बाय तीनपासून ३४ बाय ३४ बाय तीन मीटरपर्यंत असू शकतो.जास्त आकारमानाचे शेततळे घेण्यासाठी मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च लाभार्थ्यांनी स्वत: करायचा आहे.७५ हजारांपेक्षा जास्त खर्चही लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य आहे.
दुरुस्तीची जबाबदारी शेतकऱ्याची -या योजनेसाठी लाभार्थ्याने महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा. आधार प्रमाणीकरण करून घ्यावे व वैयक्तिक तपशील व मोबाईल क्रमांक भरावा. अर्जाचे शुल्क २३ रुपये ६० पैसे आहे. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक आहे.
कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील.कार्यारंभ आदेश किंवा पूर्वसंमती पत्र मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील. बँक खाते क्रमांक कृषी सहाय्यकांकडे सादर करावा. कामासाठी अग्रीम दिला जात नाही. शेततळ्याच्या बांधावर स्थानिक झाडे लावावीत. शेततळ्याची देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी लाभार्थ्याची आहे. अधिक माहितीकरिता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
शाश्वत सिंचनाची सोय निर्माण करणाऱ्या या योजनेतून दुष्काळी भागात पीक क्रांती होत आहे. सिंचनाची हमी मिळाल्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होऊन शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावले आहे. अशी ही शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देणारी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कोरडवाहू शेतीसाठी वरदानच ठरली आहे.
शिर्डी उप-माहिती कार्यालय,यांचेकडून प्रसिद्ध